बीडीओंच्या बनावट स्वाक्षरीवर उचलले पैसे
By Admin | Updated: October 5, 2014 23:13 IST2014-10-05T23:13:31+5:302014-10-05T23:13:31+5:30
गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले.

बीडीओंच्या बनावट स्वाक्षरीवर उचलले पैसे
सव्वादोन लाख : ग्रामसेवकाचा प्रताप
आर्णी : गटविकास अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून बँकेतून सव्वादोन लाख रुपये उचलल्याचा प्रताप एका ग्रामसेवकाने केला. निवडणूक काळात सुरू असलेल्या चेकपोस्ट नाक्यावरील तपासणीत हे बिंग फुटले. तोपर्यंत गटविकास अधिकाऱ्यांनाही आपल्या खात्यातून पैसे काढल्याचा थांगपत्ता नव्हता. हा प्रकार आर्णी तालुक्यातील म्हसोला पहूरच्या ग्रामसेवकाने केला असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
निर्मल भारत अभियानांतर्गत तालुक्यातील म्हसोला पहूर नस्करी या गावासाठी मोठ्या प्रमाणात निधी आला आहे. हा निधी काढण्यासाठी गटविकास अधिकाऱ्याची लेखी परवानगी घ्यावी लागते. मात्र तेथील ग्रामसेवक ए.एस. निळे यांनी गटविकास अधिकारी चंद्रकांत बंड यांची बनावट स्वाक्षरी केली आणि बँकेतून दोन लाख ३० हजार रुपये काढले. या प्रकाराची साधी कुणकुणही गटविकास अधिकाऱ्यांना नव्हती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहराबाहेर चेकपोस्ट तयार करण्यात आले. त्या ठिकाणी वाहनाची तपासणी करत असताना ग्रामसेवकाच्या कारमध्ये ९२ हजारांची रोकड आढळून आली. चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
मात्र नंतर सखोल चौकशीअंती हा प्रकार उघडकीस आला. त्यावरून गटविकास अधिकारी चंद्रकांत बंड यांनी आर्णी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून ग्रामसेवक निळे यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. सदर रक्कम २५ ते ३० सप्टेंबरदरम्यान काढल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. (शहर प्रतिनिधी)