पोडावर फोफावतोय सावकारीचा धंदा
By Admin | Updated: June 9, 2017 01:51 IST2017-06-09T01:51:05+5:302017-06-09T01:51:05+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागासह कोलाम पोडावर सावकारी व्यवसाय चांगलाच फोफावला असून त्यातून सामान्य गरीबांची लूट केली जात आहे.

पोडावर फोफावतोय सावकारीचा धंदा
लोकमत न्यूज नेटवर्क
झरी : तालुक्यातील ग्रामीण भागासह कोलाम पोडावर सावकारी व्यवसाय चांगलाच फोफावला असून त्यातून सामान्य गरीबांची लूट केली जात आहे.
सावकारीवर कायद्याने बंदी असली तरी घेण्यांची गरज व देणाऱ्याच्या स्वार्थातून सावकारांचा जन्म झाला. खेड्यापाड्यात व विशेषकरून पोडावर ही सावकारी जोरात सुरु आहे. तेलंगाणा प्रांतातील व राजस्थानमधील सावकार लोक या भागात येऊन गरजू लोकांना टक्केवारी, सवाई व दिडीने पैसे वाटप करीत आहेत. पैसे घेण्याची इच्छा नसूनही गरजेपोटी लोकांना व्याजाने पैसे घ्यावे लागत आहेत.
पोडावरील नागरिक मात्र या सावकारीचे समर्थन करतात. सावकार आमचा हंगाम कधीच पाडत नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. या सावकारीच्या व्यवसायातून अर्धवन, मांगली, अडेगाव, लिंगटी, धानोरा, पाटण, माथार्जुन, मुकुटबन, हिरापूर या भागातील अनेक सावकार गब्बर झाले असून ते आता पैशाच्या जोरावर राजकारणात उतरले आहेत.
शेतीवरील वाढता खर्च, उत्पनात झालेली घट, मालाला पुरेसा भाव नाही, मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, इतर कुठलाही शेतीपूरक व्यवसायाचा अभाव, नैसर्गिक व मानवनिर्मित संकटे, सिंचनाची कमतरता आदी कारणाने शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. झरी तालुक्यात कोणताही उद्योग नसल्याने फक्त शेतमजुरीवरच सर्व कुटुंबाचा उदरनिर्वाह असल्याने हा भार पेलवताना शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यात सावकाराकडून लूट सुरू आहे.