बिटरगावातील व्यापाऱ्याच्या खुनामागे पैशाचा वाद
By Admin | Updated: March 28, 2017 01:19 IST2017-03-28T01:19:56+5:302017-03-28T01:19:56+5:30
बिटरगाव येथील धान्य व्यापाऱ्याच्या खुनामागे धान्य खरेदीतील पैशाचा वाद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

बिटरगावातील व्यापाऱ्याच्या खुनामागे पैशाचा वाद
यवतमाळ : बिटरगाव येथील धान्य व्यापाऱ्याच्या खुनामागे धान्य खरेदीतील पैशाचा वाद असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यातील मारेकरी हा बिटरगाव येथीलच असून त्याला परभणी येथून अटक करण्यात आली आहे.
बळीराम उर्फ बळी गणपत तुपेकर (२४) रा. बिटरगाव असे अटकेतील मारेकऱ्याचे नाव आहे. त्याने गावातीलच धान्य व्यापारी व्यंकटेश वट्टमवार (४८) यांचा शनिवारी सायंकाळी कुऱ्हाडीने घाव घालून निर्घृण खून केल्याचे पुढे आले. बळीचा भाऊ दत्ता तुपेकर याने विकलेल्या धान्याचे पैसे मागण्यासाठी बळी व्यापाऱ्याकडे गेला होता. परंतु व्यवहार भावासोबत झाला त्यामुळे त्यालाच पैसे देईल, असे म्हटल्यावरून वाद वाढला. या वादातच बळीने व्यंकटवर कुऱ्हाडीने वार करून पळ काढला. परंतु खून करताना कुणीही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्यामुळे गुन्ह्याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते. पोलिसांनी मृताच्या शरीरावरील कुऱ्हाडीचे घाव आणि पळालेल्या आरोपीच्या पावलाचे ठसे याला केंद्रबिंदू केले. व्यापाऱ्यावर हल्ला करणारा हा डावखोरा आणि लंगडत चालणारा असल्याच्या निष्कर्षाप्रत पोलीस पोहोचले. त्यानंतर अशा व्यक्तीचा गावातच शोध सुरू झाला. शेवटी आरोपी बळी असल्याचे प्रथमदर्शनी पुढे आले. तसेच तो गावात नसल्याने पोलिसांचा संशय आणखी बळावला. यावरूनच त्याला परभणी जिल्ह्यातील मिरखेल शेतशिवारातून अटक केली.
ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक अजय बन्सल यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी लष्करे, सहायक निरीक्षक सुरज बोंडे, उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार, जमादार भीमराव शिरसाठ, हरीष राऊत, चालक तांबेकर, होमगार्ड गायकवाड यांनी केली. (कार्यालय प्रतिनिधी)
डाव्या हाताने वार आणि अपंगाच्या पाऊलखुणा
धान्य व्यापाऱ्याच्या शरीरावर झालेले कुऱ्हाडीचे वार हे डाव्या हाताने केलेले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिवाय घटनास्थळी आढळलेले पायाचे ठसे हे कुण्यातरी अपंगाचे असावे, असा निष्कर्ष काढला गेला. या दोन बाबीच पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचविण्यासाठी महत्वपूर्ण ठरल्या.