सोमवार ठरला आंदोलन वार
By Admin | Updated: March 7, 2017 01:23 IST2017-03-07T01:23:20+5:302017-03-07T01:23:20+5:30
समाजाच्या विविध घटकातील लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर विविध संस्था-संघटनांनी आंदोलन केले.

सोमवार ठरला आंदोलन वार
तूर दरवाढीसाठी वारकरी रस्त्यावर : अंगणवाडी, बालवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा
यवतमाळ : समाजाच्या विविध घटकातील लोकांचे प्रश्न सोडविण्याच्या मागणीसाठी सोमवारी जिल्हा कचेरीसमोर विविध संस्था-संघटनांनी आंदोलन केले. एकूणच सोमवार आंदोलन वार ठरला. शेतकरी वारकरी संघटना, आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था, हलबी आदिम जमात मंडळ ढाणकी आणि आयटकने केलेल्या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला होता.
शेतकरी वारकरी संघटनेने तूर दरवाढीसाठी धरणे दिले. यावर्षी तुरीची विक्रमी उत्पन्न झाले. मात्र दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे. गत वर्षी नऊ हजार ५०० रुपयेपर्यंत भाव मिळाला. यावर्षी खासगी व्यापाऱ्यांकडे तीन हजार ५०० ते तीन हजार ८०० एवढा दर आहे. नाफेडनेही खरेदीसाठी विविध कारणे पुढे केली आहेत. शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे ही परिस्थिती निर्माण झाली असल्याचे शेतकरी वारकरी संघटनेने म्हटले आहे. तुरीला सात हजार ५०० रुपये दर द्यावा, नाफेड विनाअट सरसकट तूर खरेदी करावी, सोयाबीन प्रमाणेच तूर उत्पादकांना एक हजार प्रति क्ंिवटल अनुदान द्यावे आदी मागण्या करीत त्यांनी तूर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात फेकली. संघटनेचे अध्यक्ष सिकंदरभाई शाह, अनुप चव्हाण यांनी नेतृत्व केले.
अंगणवाडी, बालवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न घेऊन आयटकने मोर्चा काढला. स्थानिक बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळून गार्डन रोड मार्गे हा मोर्चा जिल्हा कचेरीवर धडकला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे, २०१४ पासून लागू करण्यात आलेली पेन्शन मिळावी, तीन वर्षांपासून थकीत असलेला प्रवास भत्ता द्यावा, यवतमाळ बाल विकास प्रकल्प कार्यालयातील पर्यवेक्षिका कुंदा चौधरी यांची त्वरित बदली करावी आदी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आयटकच्या अध्यक्ष उषाताई डंभारे, सचिव गुलाब उमरतकर यांनी नेतृत्व केले. (शहर वार्ताहर)
हलबी आदिम जमात व समन्वयचे धरणे
अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात होत असलेला अन्याय दूर करावा या मागणीसाठी हलबी आदिम जमात मंडळ ढाणकीच्यावतीने जिल्हा कचेरीसमोर धरणे देण्यात आले. उमरखेडचे उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे आणि उमरखेडचे नायब तहसीलदार शिंदे हे आकसापोटी अनुसूचित जमातीच्या नागरिकांची मानहानी करीत आहे. त्यामुळे प्रकाश काटोले, अशोक सोनकुसरे यांच्या अर्जानुसार या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष अनिल कुसरे यांच्या नेतृत्वात धरणे देऊन जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. याच मागणीला घेऊन आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्थेतर्फे धरणे देण्यात आले. अशोक सोनकुसरे यांच्यावर जात प्रमाणपत्राच्या नावाखाली आकसापोटी करण्यात आलेली फौजदारी कारवाई मागे घ्यावी, महाराष्ट्र शासनाचे २२ जून २०१६ चे परिपत्रक रद्द करावे आदी मागण्यांसाठी धरणे देऊन निवेदन दिले. संस्थेचे अध्यक्ष शाम सोनकुसले, शामराव अडबोल यांनी नेतृत्व केले.