सोमवारपासून प्रशासनात ‘नवा गडी नवा राज’
By Admin | Updated: May 16, 2015 00:23 IST2015-05-16T00:23:58+5:302015-05-16T00:23:58+5:30
जिल्हा प्रशासनात सोमवारपासून नवा गडी नवा राज सुरू होणार आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस ...

सोमवारपासून प्रशासनात ‘नवा गडी नवा राज’
कलेक्टर-एसपी रूजू होणार : नागरिकांना कणखर प्रशासनाची प्रतीक्षा
यवतमाळ : जिल्हा प्रशासनात सोमवारपासून नवा गडी नवा राज सुरू होणार आहे. नवनियुक्त जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक १८ मे रोजी यवतमाळची सूत्रे स्वीकारणार असल्याची माहिती आहे.
यवतमाळचे जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांची परभणीत तर जिल्हा पोलीस अधीक्षक संजय दराडे यांची नागपूरला राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक म्हणून अल्पावधीतच बदली झाली. त्यांच्या जागेवर परभणीतून सचिंद्र प्रताप सिंग आणि धुळ्यातून अखिलेशकुमार सिंग यांना यवतमाळात अनुक्रमे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पाठविण्यात आले आहे. सोमवारी हे दोनही अधिकारी येथे रुजू होणार असल्याचे सांगण्यात येते. एसपी अखिलेशकुमार रविवारी रात्री मुक्कामी येत आहेत. सोमवारी ते प्रभार स्वीकारतील. या दोनही नव्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून यवतमाळ जिल्ह्यातील जनतेला कणखर प्रशासनाची प्रतीक्षा आहे. राजकीय नेत्यांना आपल्या कामात हस्तक्षेप करू न देणारे म्हणून या दोनही अधिकाऱ्यांची ओळख आहे.
परभणीत दोन वर्षांपासून कार्यरत सचिंद्र प्रताप सिंग यांनी सर्वप्रथम आपल्या महसूल खात्याला शिस्त लावली. तहसील, एसडीओ कार्यालयांना अकस्मात भेटी देणे, तेथील कामकाज सुधारणे, लेटलतिफ बाबूंना वठणीवर आणण्याचे काम त्यांनी केले आहे. परभणीतील ४५ ते ५० वर्ष जुने अतिक्रमण आपल्या मोहिमेत उद्ध्वस्त करण्याची धाडसी कारवाईही त्यांनी तेथे केली आहे. जिल्ह्याचा कारभार ताठरपणे चालविणाऱ्या अशाच प्रशासनाची जिल्ह्याला गेल्या काही महिन्यांपासून प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतीक्षा सिंग यांच्या नियुक्तीमुळे संपल्याचे मानले जात आहे. थेट आयपीएस असलेल्या अखिलेशकुमार सिंग यांच्याही कामकाजाचा असाच धुमधडाका असल्याचे सांगितले जाते. अवैध धंदे आणि त्यातून होणाऱ्या उलाढालीला त्यांचा प्रखर विरोध राहिला आहे. गुन्हा घडण्यापूर्वी त्याला प्रतिबंध घालणे आणि गुन्हा घडलाच तर तो तत्काळ डिटेक्ट करणे यावर सिंग यांचा भर असल्याचे सांगितले जाते. तेसुद्धा पोलीस प्रशासनात राजकीय हस्तक्षेप खपवून घेत नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात येऊ घातलेल्या या ताठर नेतृत्वाची जनतेला आस लागली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
नो पॉलिटिकल क्रेडिट
प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्यांमध्ये नेहमीच राजकीय हस्तक्षेप पहायला मिळाला आहे. कोणताही नवा अधिकारी आला की तो आपल्या नेत्याने आणला असा प्रचार त्यांच्या राजकीय कार्यकर्त्यांकडून केला जातो. मात्र यवतमाळच्या नवनियुक्त कलेक्टर व एसपी या दोनही अधिकाऱ्यांबाबत आता असे काही म्हणण्याची सोय उरलेली नाही. भाजपा किंवा सेनेने हे अधिकारी आणलेले नसून त्यांच्या कर्तृत्वामुळे खास मुसक्या आवळण्यासाठी त्यांना येथे पाठविले गेल्याचे शासकीय वर्तुळात मानले जात आहे.