प्रवीण दिवटेच्या मारेकऱ्यांवर ‘मोक्का’
By Admin | Updated: September 7, 2016 01:23 IST2016-09-07T01:23:15+5:302016-09-07T01:23:15+5:30
माजी नगरसेवक प्रवीण दिवटे याच्या खुनातील सर्व आरोपींवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा)

प्रवीण दिवटेच्या मारेकऱ्यांवर ‘मोक्का’
प्रस्ताव बनतोय : दीर्घकाळ कारागृहात ठेवणार
यवतमाळ : माजी नगरसेवक प्रवीण दिवटे याच्या खुनातील सर्व आरोपींवर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा) लावण्याची तयारी पोलीस प्रशासन स्तरावर सुरू असल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोक्काच्या माध्यमातून गुन्हेगारी टोळीच्या या दहा-बारा सदस्यांना कारागृहातच दीर्घकाळ स्थानबद्ध ठेवण्याची पोलिसांची व्युहरचना आहे.
प्रवीण दिवटे याचा वाघापूर रोड स्थित बांगरनगरातील घर वजा कार्यालयात सहा गोळ्या झाडून आणि तलवार, चाकूंनी वार करुन निर्घृण खून करण्यात आला होता. या खुनात पोलिसांनी आतापर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. या सदस्यांना दीर्घकाळ कारागृहात कसे ठेवता येईल, या दृष्टीने पोलीस मंथन करीत आहेत. या सदस्यांवर वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा शिवाय बाहेर असलेल्या अन्य सदस्यांच्या हालचालींवर कायमस्वरूपी ‘वॉच’ ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर हे सदस्य जामीन मिळविण्यासाठी धडपड करण्याची शक्यता पाहता त्यांना जामीन मिळू नये, यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. प्रतिबंधात्मक कारवाईचाच एक भाग म्हणून या सर्व सदस्यांवर ‘मोक्का’ लावण्याची तयारी केली जात आहे. संबंधित पोलीस यंत्रणा प्रस्ताव तयार करण्याच्या कामीही लागल्याचे सांगितले जाते. ‘मोक्का’मध्ये आजीवन जन्मठेपेची तरतूद आहे. शिवाय त्यात सहसा जामीन दिला जात नाही. त्यामुळे मोक्काच्या माध्यमातून दिवटेच्या मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांचा प्रयत्न दिसून येतो. या खुनात आरोपी म्हणून कुणा-कुणाची नावे तपासात पुढे येतात याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दिवटेच्या खुनाचा तपास एलसीबीकडे सोपविण्यात आला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)