आमदारकीचा मोह सुटेना
By Admin | Updated: August 18, 2014 23:48 IST2014-08-18T23:48:28+5:302014-08-18T23:48:28+5:30
मी किंवा माझा मुलगा वणी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भीम गर्जना काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अवघ्या काही

आमदारकीचा मोह सुटेना
काँग्रेस जिल्हाध्यक्षांची प्रतिज्ञा हवेत : मुलाखतीसाठी पुन्हा हजर
यवतमाळ : मी किंवा माझा मुलगा वणी मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढणार नाही, अशी भीम गर्जना काँग्रेसचे आमदार तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी अवघ्या काही महिन्यांपूर्वी येथे पत्रपरिषदेत केली होती. मात्र या प्रतिज्ञेवरून अद्याप तीन महिनेही लोटले नसताना कासावार स्वत:च काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी पक्षाच्या संसदीय समितीसमोर मुंबईत रविवारी हजर झाले. यावरून कासावारांना आमदारकीचा मोह सुटता सुटत नसल्याचे सिद्ध होते.
वामनराव कासावार यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत दुसऱ्या फळीतील नेत्यांनी उघड बंड पुकारले होते.
या पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषद घेऊन कासावार यांच्या काँग्रेस जिल्हाध्यक्ष पदाच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सोबतच विद्यमान मंत्री-आमदार किंवा त्यांच्या मुलांना पक्षाने पुन्हा काँग्रेसचे तिकीट देऊ नये, अशी मागणी केली होती. या मागणीला प्रतिसाद देत दोन दिवसांनी वामनराव कासावार यांनी पत्रपरिषद घेऊन आपल्या राजीनाम्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे, तर यापुढे मी किंवा माझा मुलगा वणी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार नाही, अशी प्रतिज्ञा कासावार यांनी पत्रकारांसमक्ष घेतली होती. या घोषणेवरून अवघे काही दिवस लोटत नाही तोच वामनराव पुन्हा आमदारकीसाठी सज्ज झाल्याचे दिसून आले. त्यांना आपल्या या घोषणेचा विसर पडला की काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वणीमध्ये काही दिवसांपूर्वी पक्ष निरीक्षकांकडून मुलाखती झाल्या. तेव्हा कासावार स्वत: तेथे उपस्थित नव्हते. परंतु आपल्याशिवाय कुणी दावेदारी करणार नाही याची खबरदारी त्यांनी घेतली. तीनही तालुक्यातून त्यांचेच नाव पुढे केले गेले.
आता रविवारी मुंबईत काँग्रेस पक्षाच्या संसदीय समितीपुढे इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तेव्हासुद्धा वणी विधानसभा मतदारसंघातून वामनराव कासावार एकटेच मुलाखतीला सामोरे गेले. ते पाहता वामनरावांच्या घोषणेचे काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)