मोघेंची दिल्लीत फिल्डींग
By Admin | Updated: December 6, 2014 22:55 IST2014-12-06T22:55:18+5:302014-12-06T22:55:18+5:30
प्रदेशाध्यक्ष असूनही जिल्ह्यात गटा-तटाच्या राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी आता माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुढाकार घेतला आहे.

मोघेंची दिल्लीत फिल्डींग
हवे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पद : माणिकरावांना शह देण्याचा प्रयत्न
यवतमाळ : प्रदेशाध्यक्ष असूनही जिल्ह्यात गटा-तटाच्या राजकारणाला खतपाणी घालणाऱ्या माणिकराव ठाकरे यांना धडा शिकविण्यासाठी आता माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुढाकार घेतला आहे. मोघे यांनी थेट काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी फिल्डींग लावली असून त्यांना माजी मुख्यमंत्र्यांचेही पाठबळ मिळत असल्याचे सांगितले जाते.
विधानसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी स्वीकारून आमदार माणिकराव ठाकरे यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मात्र अद्याप तो मंजूर न झाल्याने माणिकराव प्रदेशाध्यक्ष म्हणूनच सर्वत्र फिरत आहे. माणिकरावांच्या कार्यकाळात आधी लोकसभा निवडणुकीत व नंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा बोऱ्या वाजला. मात्र त्यानंतरही माणिकराव राजीनामा मंजूर न झाल्याचे कारण पुढे करीत राज्यभर पुन्हा प्रदेशाध्यक्ष म्हणून मिरवित असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते.
प्रदेशाध्यक्षपदी असल्याने माणिकरावांनी काँग्रेसच्या तमाम पदाधिकारी व कार्यकर्त्यांना एकजुटीचा संदेश देणे बंधनकारक आहे. मात्र यवतमाळ या त्यांच्या गृहजिल्ह्यातच ते गटबाजीला खतपाणी घालत असल्याचे विधानसभा निवडणुकीत दिसून आले. वामनराव कासावार यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटविण्यासाठी पक्षातीलच पदाधिकाऱ्यांनी पत्रपरिषदेद्वारे केलेली जाहीर मागणी, नंतर यातीलच आपल्या मर्जीच्या काही पदाधिकाऱ्यांना आश्रय देणे, त्यांना पुन्हा कार्यकारिणीत सामावून घ्यावे म्हणून चक्क कार्यकारिणीच मुंबईत अडवून ठेवणे, या बंडखोरांपैकी एकाला विधानसभेची उमेदवारी देणे या सर्व घडामोडींमागे माणिकरावच असल्याचा राजकीय गोटातील सूर आहे. याच माणिकरावांना शह देण्यासाठी आता माजी सामाजिक न्यायमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांनी मोर्चेबांधणी चालविली आहे.
काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदासाठी मोघेंनी थेट दिल्लीपर्यंत फिल्डींग लावल्याचे सांगण्यात येते. गेल्या आठवड्यात मोघे यांची दिल्लीत काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांच्याशी सुमारे १५ मिनिटे बंदद्वार चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यात माणिकरावांचा राजीनामा मंजूर करणे आणि प्रदेशाध्यक्ष पदाची माळ मोघेंच्या गळ्यात घालण्याचे संकेत दिले गेल्याचे सांगण्यात येते. मोघेंच्या या प्रयत्नांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा ग्रीन सिग्नल असल्याची माहिती आहे. लोकसभा व विधानसभा या दोनही निवडणुकांमध्ये माणिकरावांचे आर्थिक व अन्य अधिकार गोठवून ते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्यात आले होते. आता माणिकरावांनी विधानसभेतील विरोधी पक्ष नेते पदावर राधाकृष्ण विखे पाटील यांचा दावा सांगून पुन्हा लाल दिवा आपल्याच मर्जीतील नेत्याकडे ठेवण्याचा मनसुबा आखला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव गटनेते पदासाठी पुढे येऊ नये म्हणून माणिकरावांनीच काँग्रेस आमदारांमध्ये लॉबिंग केल्याची चर्चा आहे. प्रदेशाध्यक्ष पद मिळविण्यात शिवाजीराव मोघे यशस्वी होतात का याकडे नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)