मोदी सरकारने सामान्य माणसांची फसगत केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 21:17 IST2019-04-01T21:17:27+5:302019-04-01T21:17:55+5:30
‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला.

मोदी सरकारने सामान्य माणसांची फसगत केली
लोकमत न्यूज नेटवर्क
वणी : ‘अच्छे दिन’ येणार असे स्वप्न दाखवून पाच वर्षांपूर्वी मोदी सरकारने या देशातील सामान्य माणसांची प्रचंड फसगत केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोकराव चव्हाण यांनी येथे केला.
सोमवारी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. देशात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. त्या रोखण्यासाठी मोदी सरकारने कोणतेही प्रयत्न केले नाही. सत्तेवर आल्यानंतर सर्वप्रथम शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याची थाप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मारली होती. मात्र या विषयातही शेतकऱ्यांची फसगत झाल्याचे ते म्हणाले. लोकांनी तुम्हाला विश्वास ठेऊन सत्तेवर पाठविले. परंतु जनतेची तुम्ही फसवणूक केली. हे सरकार संवदेनहिन असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. या देशात मोठ्या उद्योगपतींना कर्ज दिले जाते. परंतु या उद्योगपतींनी कर्ज बुडविल्याने आता सामान्य माणसालाही कर्ज मिळणे कठीण झाले आहे. या सरकारचा आॅनलाईनवर भर आहे, परंतु हे सरकारच आॅफलाईन झाले असल्याचे चव्हाण म्हणाले. यावेळी माजी मंत्री विजय वडेट्टीवार, अॅड. शिवाजीराव मोघे, प्रा.वसंत पुरके, चंद्रकांत हांडोरे, मनसेचे राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र लोढा, माजी आमदार वामनराव कासावार व बाळू धानोरकर यांनी आपल्या भाषणातून मोदी सरकारवर कडवी टिका केली. संचालन विवेक मांडवकर यांनी केले, तर आभार प्रमोद निकुरे यांनी मानले. सकाळी १० वाजताच्या या सभेला अशोक चव्हाण तब्बल साडेपाच तास विलंबाने उपस्थित झाले. व्यासपिठावर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा, माजी आमदार सुभाष धोटे, अॅड.देविदास काळे, मुनाफ हकीम आदी उपस्थित होते.