मोदी महालाटेची मंत्र्यावर मात
By Admin | Updated: May 17, 2014 23:54 IST2014-05-17T23:54:00+5:302014-05-17T23:54:00+5:30
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात नरेंद्र मोदी यांच्या महालाटेवर आरूढ होऊन भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी राज्यात मंत्री असलेल्या कॉंग्रेसच्या संजय देवतळे यांच्यावर प्रचंड मात केली.

मोदी महालाटेची मंत्र्यावर मात
रवींद्र चांदेकर - वणी
चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघात नरेंद्र मोदी यांच्या महालाटेवर आरूढ होऊन भाजपाचे उमेदवार हंसराज अहीर यांनी राज्यात मंत्री असलेल्या कॉंग्रेसच्या संजय देवतळे यांच्यावर प्रचंड मात केली. त्यामुळे कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि वणी विधानसभा मतदार संघाचे आमदार वामनराव कासावार तथा आर्णी विधानसभा मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे मंत्री शिवाजीराव मोघे यांची येत्या विधानसभा निवडणुकीत कसोटी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महायुतीचे उमेदवार म्हणून हंसराज अहीर यांची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच उमेदवारी घोषित झाली होती. कॉंग्रेस उमेदवारीचे गुºहाळ मात्र अखेरपर्यंत सुरू होते. त्यामुळे शेवटच्या क्षणी देवतळे यांची उमेदवारी जाहीर झाली. वणी लगतच्या वरोरा विधानसभा मदार संघाचे ते प्रतिनिधीत्व करतात. मात्र त्यांचा मंत्री होईपर्यंत वणीशी कधी फारसा संबधच आला नाही. मंत्री झाल्यानंतर त्यांनी दोन-चारदा वणीत येऊन बैठका घेतल्या. त्या बंदीस्त होत्या. त्यामुळे त्यांचा जनतेशी कधी थेट संपर्क आलाच नाही. याउलट महायुतीचे अहरि विद्यमान खासदार होते. वणी आणि आर्णी मतदार संघातच त्यांनी कायम संपर्क ठेवला. अगदी लहान-सहान कार्यक्रमांना त्यांनी खेडोपाडी सतत हजेरी लावली. या दोनही मतदार संघातील जवळपास सर्व गावेच त्यांनी गेल्या पाच वर्षात पालथी घातली. त्यामुळे जनतेशी त्यांची नाळ जुळली गेली. सामान्य मतदारांना त्यांच्याप्रती आपुलकी निर्माण झाली. मात्र गेल्या पाच वर्षांत त्यांनी या दोनही मतदार संघासाठी कोणतीही भरीव कामगिरी केली नसताना केवळ संपर्क आणि मोदी लाटेमुळे त्यांना विजय सुलभ झाला. देवतळे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आघाडीत कलह माजला. वणी मतदार संघातील राष्ट्रवादी तर चक्क ‘आप’चे उमेदवार वामनराव चटप यांच्या मागे उभी राहिली. पांढरकवडा तालुक्यातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी मात्र देवतळे सोबत होते. तथापि आर्णीतील राष्ट्रवादीही दुभंगली होती. वणीत काही कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते ‘मना’पासून देवतळे यांच्या प्राचारात उतरलेच नाही. त्यासाठी ‘रसद’ ही बाब महत्वाची ठरली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार वामनराव कासावार यांना जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदार संघावर लक्ष ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांना वणीकडे पुरेपूर लक्ष देता आले नाही. त्यांच्या गैरहजेरीत काँग्रेसच्या दुसर्या फळीतील नेते, पदाधिकारी थंडावले गेले. तिकडे आर्णी विधानसभा मतदार संघात मंत्री शिवाजीराव मोघे यवतमाळ-वाशीमचे उमेदवार असल्याने ते यवतमाळात अडकले. त्यांचे सर्व मावळेही तिकडेच गेले. त्यामुळे देवतळेंना केवळ तेथील राष्ट्रवादीवर अवलंबून राहावे लागले. याउलट अहीर यांच्यासाठी भाजपासोबतच शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर आणि सर्व पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अॅड.विनायक काकडे यांच्यासह कार्यकर्ते परिश्रम घेताना दिसले. नियोजनबद्ध प्रचाराची त्यात भर पडली. या सर्वासोबतच मोदी महालाटेचा प्रचंड लाभ अहीर यांना झाला. या सर्वांचा फटका देवतळे यांना बसला. परिणामी वणीत अहीर यांनी देवतळे यांच्यावर चक्क ५३ हजार ८४८ मतांची, तर आर्णीत तब्बल ५९ हजार ८१४ मतांची आघाडी प्राप्त केली. वणी आणि आर्णीत अहीर यांना प्रचंड आघाडी मिळाल्याने येत्या विधानसभा निवडणुकीत वणीतून कासावार आणि आर्णीतून मोघे यांची कसोटी लागणार आहे. त्यांच्यासाठी ही धोक्याची घंटा वाजली आहे. दुसरीकडे महायुतीच्या प्रचंड विजयामुळे शिवसेना आणि भाजपाच्या संभाव्य उमेदवारांच्या मनात लाडू फुटत आहे.