जिल्ह्यात मोबाईल मटक्याचा धुमाकूळ

By Admin | Updated: December 7, 2014 22:57 IST2014-12-07T22:57:39+5:302014-12-07T22:57:39+5:30

जिल्ह्यात सध्या मोबाईल मटक्याचा प्रचंड धुमाकूळ सुरू असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मटका-जुगार अड्ड्यांची संख्या जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक असून त्याच्या

Mobile mobility in the district | जिल्ह्यात मोबाईल मटक्याचा धुमाकूळ

जिल्ह्यात मोबाईल मटक्याचा धुमाकूळ

कोट्यवधींची उलाढाल : २०० वर अड्डे, नेटवर्कमध्ये शेकडो तरुणांचा समावेश
यवतमाळ : जिल्ह्यात सध्या मोबाईल मटक्याचा प्रचंड धुमाकूळ सुरू असून त्यात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. मटका-जुगार अड्ड्यांची संख्या जिल्ह्यात दोनशेपेक्षा अधिक असून त्याच्या नेटवर्कमध्ये शेकडो तरुण ओढले गेले आहेत. पोलिसांच्या साक्षीनेच हे जुगार अड्डे चालविले जात आहेत.
‘लोकमत’ चमूने ‘स्टिंग आॅपरेशन’साठी येथील धामणगाव रोड स्थित कॉटन मार्केट चौकातील पोलीस चौकीच्या शेजारीच चालणाऱ्या या मटका अड््याची निवड केली. रस्त्यावरून कुणालाही सहज दिसेल असा हा अड्डा आहे. तेथे जुगार, चेंगळ अर्थात दहा पत्त्यांचा तत्काळ रिझल्ट देणारा गेमही चालविला जात आहे. एका दारू व्यावसायिकाने ६०० रुपये ‘सुलभ’ रोजाने भाड्याने दिलेल्या जागेत हा व्यवसाय थाटला गेला आहे. या अड्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आहे. सकाळीच सुरू होणारा हा अड्डा रात्री उशिरापर्यंत चालतो. दुपारी १.३० आणि सायंकाळी ६ वाजता या अड्ड्यावर प्रचंड गर्दी असते. या अड्ड्यावर १० ते २० कर्मचारी केवळ आकडे लिहिण्यासाठी तैनात आहेत. तेथे शाळेत लिखाण कामासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक पाट्या लावण्यात आल्या असून त्यावर आकडे लिहिले जातात. या एकाच अड्ड्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील हमाल व अन्य घटक बरबाद होताना दिसत आहे. कष्ट करून मिळविलेला पैसा घरात कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी जाण्याऐवजी मटका अड्ड्यावरच खर्ची होत आहे. पाच जणांनी एकत्र येऊन अलिकडेच हा मटका अड्डा सुरू केला. या अड्ड्यामुळे कॉटन मार्केट चौकात मद्यपींची संख्या वाढली असून त्यातूनच गर्दी व अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
यवतमाळ शहर आणि लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रात असे अनेक दारू, जुगार, मटक्याचे अवैध अड्डे आहेत. रेल्वेस्टेशन, संभाजीनगर, आठवडी बाजार, अप्सरा टॉकीज परिसर, उमरसरा, आर्णी रोड, कळंब चौक, तलाव फैल, पिंपळगाव अशा कित्येक भागात आणि सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे अड्डे सुरू आहेत. अर्थात या अड्ड्यांना संबंधित पोलिसांचे सुरक्षा कवच आहे. या अड्ड्यांवर होणाऱ्या आर्थिक उलाढालीचे पोलीस ‘वाटेकरी’ आहेत.
सुमारे वर्षभरापूर्वी जिल्ह्यात दारू, जुगार, मटका निश्चितच सुरू होता. मात्र तो खुलेआम कधीही चालला नाही. एसपींनी ठाणेदारांच्या मुसक्या आवळल्याने हे अवैध धंदे नियंत्रणात आणि चोरट्या मार्गाने सुरू होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून या अवैध धंद्यांना पोलीस प्रशासनाने पूर्णत: मोकळीक दिली की काय, असे चित्र पहायला मिळत आहे. ठाणेदारांच्या मुसक्या पूर्णत: सोडल्या गेल्या आहेत. प्रशासनच मेहेरबान असल्याने ठाणेदारांनी कालपर्यंत गल्लीत चालणारे दारू, जुगार, मटका अड्डे चक्क रस्त्यावर आणले आहेत. एवढेच नव्हे तर नव्या काऊंटरलाही परवानगी दिली आहे. पर्यायाने आज सर्वच पोलीस ठाण्यांच्या हद्दीत बिनबोभाटपणे अवैध व्यवसाय सुरू आहे. त्यातून कोणतेही पोलीस ठाणे, कोणतेही तालुका व शहर मुख्यालय तसेच मोठी गावे सुटलेली नाहीत. ठिकठिकाणी अड्डे थाटले गेले आहेत. त्यातही मोबाईल मटक्याने आणखीनच धुमाकूळ घातला आहे. थेट मोबाईलवर मटक्याचे आकडे उतरविले जात आहे. त्यासाठी प्रत्येकच मटका व्यावसायिकाने आपले स्वतंत्र नेटवर्क तयार केले आहे. गावागावातील अनेक तरुण, छोटे व्यावसायिक यात समाविष्ठ झाले आहे. विशेषत: पानटपरीवाल्यांची संख्या त्यात सर्वाधिक आहे. काही लॉटरी सेंटरमध्येही विशिष्ट ग्राहकांचा अतिशय छुप्या मार्गाने मटका स्वीकारला जात आहे. सहज कुठेही मटका लावता येत असल्याने शौकिनांची आयतीच सोय झाली आहे. मात्र शेतमजूर, हमाल, छोटे व्यावसायिक, तरुण वर्ग या मटका, जुगार व दारूच्या अवैध व्यवसायांमुळे देशोधडीला लागत आहेत. त्यांचे संसार उद्ध्वस्त होत आहे.
या अवैध व्यवसायातून पोलिसांच्या स्तरावर होणारी उलाढाल किती तरी लाखांच्या घरात आहे. मुळात या व्यवसायातील ‘टर्नओव्हर’ कोट्यवधी रुपयांचा आहे. त्यातून वाहणारे लाभाचे पाट दूरपर्यंत पोहोचत आहेत. नवा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी व्यावसायिकालाच पोलिसांच्या संबंधित चार ठिकाणांवरून एनओसी मिळवावी लागते. नव्या साहेबांनी हा नवा पायंडा अवैध व्यवसायांसाठी सुरू केला आहे. (लोकमत चमू)
आर्णीत बाजार समिती परिसरात शंकर नामक मटका किंग स्वत:ची वरली उघडतो. त्याच्याकडे २०० पेक्षा अधिक कर्मचारी आहे. दिग्रस रोडवरील एका ‘सेठ’च्या शेतात क्लब चालविला जातो. तेथेच प्रवास भाड्यापासून सर्व सोई उपलब्ध करून दिल्या जातात. या क्लबमध्ये चार भागीदार असून त्यातील एकाचा भाऊ पोलीस दलात ‘रायटर’ असल्याचे सांगितले जाते. आर्णीतील याच व्यवसायांच्या आड गांजासह अन्य अमली पदार्थ उघडपणे विकले जातात. असे अनेक जुने-नवीन अड्डे जिल्हाभर सुरू आहेत. पांढरकवड्यात एका हॉटेलनजीक अलिकडेच एक अड्डा सुरू झाला आहे. नेर, बाभूळगाव व राळेगाव बसस्थानक परिसर, पुसदमधील शिवाजी चौक, विठाळा वार्डात, उमरखेडमध्ये व इतरही ठिकाणी राजकीय व पोलीस प्रशासनाच्या वरदहस्ताने जुगार, मटका अड्डे सुरू आहे.

Web Title: Mobile mobility in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.