गौण खनिजात सव्वा कोटी दंड

By Admin | Updated: June 7, 2015 00:05 IST2015-06-07T00:05:34+5:302015-06-07T00:05:34+5:30

शासकीय जमीन आणि शेजारच्या शेतात गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी खनिपट्टाधारकाला ....

Minority penalty penalty | गौण खनिजात सव्वा कोटी दंड

गौण खनिजात सव्वा कोटी दंड

उपोषणानंतर जाग : उमरखेड महसुलातील सर्वात मोठी कारवाई
उमरखेड : शासकीय जमीन आणि शेजारच्या शेतात गौण खनिजाचे अनधिकृत उत्खनन केल्याप्रकरणी खनिपट्टाधारकाला तब्बल एक कोटी ३० लाख दोन हजार रुपये दंड ठोठावला आहे. महिलेने केलेल्या उपोषणानंतर खडबडून जागे झालेल्या उमरखेड महसूल प्रशासनाने ही कारवाई केली. उमरखेड महसूल विभागातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असून यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहे.
उमरखेड येथील बंडू काशीनाथ कुंटे यांना २००५ पासून मुरुम दगड उत्खननाकरिता जमीन लीजवर देण्यात आली होती. मात्र कुंटे यांनी लीजच्या जमिनीसोबतच ई-क्लास जमीन आणि लगतच्या कलाबाई लालू पवार यांच्या शेतातून गौण खनिजाचे मोठ्या प्रमाणात उत्खनन केले. या प्रकरणी कलाबाईने तक्रार केली. त्यावरून चौकशी करण्यात आली. लीजधारक कुंटे यांनी २००४-०५ पासून पाच हजार ९५१ ब्रासचे रॉयल्टी भरल्याचे पत्र दिले. सार्वजनिक बांधकामचे उपअभियंत्याने मोजणी करून अहवाल तयार केला असता त्यात २२ हजार १९६ ब्रास उत्खनन केल्याचे पुढे आले. उमरखेड येथील शेत सर्वे नं.२६/१ ई वर्ग क्षेत्रफळ २.०२ हेक्टर आरमधून १६ हजार २४५ ब्रास मुरुमाचे अतिरिक्त उत्खनन केल्याचे स्पष्ट झाले. त्यावरून बंडू कुंटे यांना तहसीलदारांनी एक कोटी ३० लाख दोन हजार रुपये दंड ठोठावला. त्यात स्वामीत्व शुल्काचे ३२ लाख ४९ हजार रुपये होत असून त्याच्या तिप्पट दंड म्हणजे ९७ लाख ४७ हजार रुपये, अवैध वाहतूक केलेल्या गौण खनिजाचे स्वामीत्व धन ३२ हजार ४९ हजार रुपये आदींचा समावेश आहे.
उमरखेड महसूल विभागाने एवढ्या मोठ्या प्रमाणात दंड ठोकण्याची ही पहिलीच वेळ आहे. या दंडामुळे अवैध गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (प्रतिनिधी)

पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात दिले कारवाईचे आदेश
मालकीच्या शेतात बंडू कुंटे यांनी अतिक्रमण करून लाखो रुपयांचे गौण खनिज बळकावले या कारणावरून कलाबाई लालू पवार या महिलेने दोनदा उपोषण केले. परंतु प्रशासनाने कुंटे यांच्यावर कारवाई करण्यास हयगय केली. दरम्यान, ५ जून रोजी पालकमंत्र्यांच्या जनता दरबारात हा विषय चर्चेचा ठरणार होता. त्यामुळेच उपोषणाला बसलेल्या कलाबाईचे उपोषण ४ जून रोजीच तहसील प्रशासनाने लक्ष घालून सोडविले. मात्र शुक्रवारी जनता दरबारात हे प्रकरण चांगलेच गाजले. पालकमंत्र्यांनी बंडू कुंटेसह तत्कालीन तलाठ्याच्या विरोधात कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार सचिन शेजाळ यांना दिले आहे.

Web Title: Minority penalty penalty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.