गौण खनिजाआड सागवान तस्करी

By Admin | Updated: February 11, 2016 02:56 IST2016-02-11T02:56:27+5:302016-02-11T02:56:27+5:30

वनसंपदेने नटलेल्या पुसद तालुक्यातील जंगलांमध्ये सध्या गौण खनिजाआड सागवान तस्करी सुरू आहे.

Minor mineral pipe smuggling | गौण खनिजाआड सागवान तस्करी

गौण खनिजाआड सागवान तस्करी


पुसद : वनसंपदेने नटलेल्या पुसद तालुक्यातील जंगलांमध्ये सध्या गौण खनिजाआड सागवान तस्करी सुरू आहे. ट्रॅक्टर व इतर वाहनात तळाशी सागवान आणि वर गौण खनिज असा सर्रास प्रकार सुरू आहे. मात्र वन अधिकाऱ्यांच्या हितसंबंधामुळे कुणावरही कारवाई केली जात नाही. संरक्षित जंगलात खुलेआम गौण खनिजाचे उत्खनन सुरू असून माती आणि दगडांची अहोरात्र वाहतूक सुरू आहे.
पुसद वन विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलात मौल्यवान सागवानासह विविध जातींचे वृक्ष आहे. मराठवाड्यातील सागवान तस्कर या जंगलांमध्ये धुमाकूळ घालत आहे. अलिकडे तर आंध्रप्रदेशातील तस्करांनीही मोर्चा या जंगलाकडे वळविला आहे. उमरखेड येथे काही दिवसांपूर्वी पकडलेले सागवान पुसदच्या राखीव जंगलातील असल्याचे पुढे आले होेते. वन अधिकाऱ्यांची गस्त नाममात्र असल्याने तस्करांचे चांगलेच फावत आहे. मराठवाडा आणि आंध्रप्रदेशातील तस्कर स्थानिकांना हाताशी धरुन वृक्षतोड करीत आहे. तोडलेले सागवान जंगलाबाहेर नेण्यासाठी आता नामी शक्कल लढविली जात आहे. गौण खनिजाच्या वाहनातून सागवान वन विभागाच्या हद्दीबाहेर नेले जात आहे. वरून रेती अथवा मुरुम दिसत असला तरी अनेक वाहनांमध्ये आतमध्ये कटसाईज सागवान असते. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असून वन विभागातील अधिकाऱ्यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
पुसद वन विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. ठिकठिकाणी वनउपज तपासणी नाके आहेत. मात्र एवढा मोठा फौजफाटा असतानाही गौण खनिजाची तस्करी सुरू आहे. गौण खनिजाआड सागवान आणि अनेकदा वन्यप्राण्यांची शिकारही केली जात आहे. या सर्व प्रकाराकडे वन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Minor mineral pipe smuggling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.