‘त्या’ कास्तकारासाठी द्रवले वाहतूक पोलिसांचे मन

By Admin | Updated: September 14, 2016 01:10 IST2016-09-14T01:10:45+5:302016-09-14T01:10:45+5:30

एकेकाळी २० एकर शेती कसणारा कास्तकार आज भणंग जीवन जगत असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली.

'The mind of the traffic police for the ransom' | ‘त्या’ कास्तकारासाठी द्रवले वाहतूक पोलिसांचे मन

‘त्या’ कास्तकारासाठी द्रवले वाहतूक पोलिसांचे मन

सकाळीच घेतली धाव : स्वच्छ आंघोळ, दाढी, जेवण, निवासाची व्यवस्था, नातेवाईकांनी दिला दगा, समाज मात्र मदतीला धावला
यवतमाळ : एकेकाळी २० एकर शेती कसणारा कास्तकार आज भणंग जीवन जगत असल्याची बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली. हे वृत्त वाचून अनेकांचे काळीज गलबलून गेले. इतरवेळी कणखर वागणाऱ्या वाहतूक पोलिसांचे हृदयही द्रवले. त्यांनी मंगळवारी सकाळीच या वृद्धाला आपल्या कार्यालयात आणून त्यांच्या जेवणाची आणि निवासाचीही व्यवस्था केली.
‘दोन औताचा कास्तकार धुंडाळतोय आसरा’ हे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. उत्तरवाढोणा गावात एकेकाळी २० एकर शेती कसणारे अनंतराव यांना नातेवाईकांनीच दगा दिला. अखेर त्यांनी गाव सोडले आणि यवतमाळात येऊन उपरे आयुष्य जगणे सुरू केले. बसस्थानक, जिल्हा रुग्णालय अशा ठिकाणी लोकांना मागून उपजिविका भागवत आहे. ‘लोकमत’ने त्यांची करुण कहाणी मांडताच समाज जागा झाला. मंगळवारी अनेकांनी त्यांना वृद्धाश्रमात नेण्याची तयारी दर्शविली. मात्र, प्रत्यक्ष सेवेच्या मैदानात उतरले ते वाहतूक पोलीस.
जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी वृत्त वाचताच आपल्या कर्मचाऱ्यांना त्या वृद्धापर्यंत पोहोचण्याचे निर्देश दिले. पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनीही तातडीने त्या कास्तकाराला घेऊन येण्याची सूचना केली.
तातडीने वाहतूक पोलीस जिल्हा रुग्णालयात पोहोचले. अत्यंत आस्थेने अनंतराव यांची चौकशी करून त्यांना वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात नेण्यात आले. अनेक दिवसांपासून आंघोळ नसलेल्या अनंतराव यांना आधी स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. कटिंग, दाढी करून देण्यात आली. पोटभर जेवण देऊन त्यांना निवांत झोपण्यास सांगण्यात आले. सायंकाळी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांनी अनंतराव यांना नवे धोतर, नवे शर्ट आणि नवी कोरी टोपी आणून दिली. हा पेहराव परिधान करताच अनंतरावांच्या चेहऱ्यावर पूर्वीचा ‘कास्तकारी रुबाब’ झळकला.
अनंतराव यांना एखाद्या वृद्धाश्रमात पाठविण्याची व्यवस्था केली जाईल. तसेच त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्यांना त्यांच्या घरी जाण्याची ईच्छा असल्यास पोहोचविण्यात येईल, असे जिल्हा वाहतूक पोलीस निरीक्षक दिलीप चव्हाण यांनी ‘लोकमत’ला सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)

विविध संघटनांनी घेतली दखल

दरम्यान, एक कास्तकार माणूस एका पोळीसाठी लाचार झाल्याचे वृत्त वाचून कायद्याचा अभ्यास करणारे विद्यार्थीही हबकून गेले. यवतमाळ येथील अमोलकचंद विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी दुपारी जिल्हा वाहतूक पोलीस शाखेच्या कार्यालयात जाऊन अनंतराव यांची भेट घेतली. त्यासोबतच वनकर्मचाऱ्यांनीही पुढाकार घेतला. विविध सामाजिक संघटनांनी दूरध्वनी तसेच प्रत्यक्ष भेटून अनंतराव यांना सर्वतोपरी मदत करण्याची तयारी दर्शविली आहे. मंगळवारी दिवसभर समाज अनंतरावांसाठी हळहळत होता, मात्र अनंतरावांचा कोणताही नातेवाईक त्यांच्याकडे फिरकला नाही, हे विशेष.

Web Title: 'The mind of the traffic police for the ransom'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.