‘मीना बाजार’ने थकविले लाखो रुपयांचे वीज बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:39+5:30
मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीलाच हे मैदान मिळते. रेकॉर्डवर मात्र भाडेकरी वेगळाच राहतो.

‘मीना बाजार’ने थकविले लाखो रुपयांचे वीज बिल
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : नाममात्र रकमेत कंत्राट घेऊन प्रत्यक्षात लाखोंची उलाढाल करीत शासनाचा महसूल बुडविल्याने चर्चेत आलेल्या आझाद मैदानातील ‘मीना बाजार’कडे लाखो रुपयांचे विद्युत बिलही थकीत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मीना बाजारसाठी आझाद मैदानातील जागा एका व्यक्तीला जास्तीत जास्त दहा दिवसांसाठी भाड्याने दिली जाते. पुढे दहा-दहा दिवसांसाठी वेगवेगळ्या नावाने कंत्राट वाढविला जातो. नावे वेगवेगळी दिसत असली तरी प्रत्यक्षात पहिल्यांदा दहा दिवसांसाठी मैदान भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीलाच हे मैदान मिळते. रेकॉर्डवर मात्र भाडेकरी वेगळाच राहतो. पहिल्या दहा दिवसासाठी ज्याला मैदान मिळाले त्याच्याच नावाने एसडीओंची आॅर्डर असते व पुढे त्याच नावाने विद्युत मीटर जारी केले जाते. वास्तविक पुढे दहा-दहा दिवसांनी बदलणाºया जागा मालकानुसार विद्युत मीटरची मालकीही बदलणे अपेक्षित असते. परंतु विद्युत महावितरण कंपनीची यंत्रणा ही तसदी घेत नाही. पहिल्या व्यक्तीच्या नावाने असलेले मीटर शेवटपर्यंत कायम राहते. वितरण कंपनी पहिल्या व्यक्तीवर विद्युत बिलासाठी दावा करू शकते. मात्र नंतरच्या भाडे करारात भाडेकरू बदललेला असतो. त्यामुळे तो हात वर करतो आणि वीज कंपनीही त्याचे काही बिघडवू शकत नाही. अशाच पद्धतीने गेल्या सात ते आठ वर्षांपासून विद्युत कंपनीचे लाखो रुपयांचे बिल थकीत आहे. मीना बाजारातील जुन्या कंत्राटदारांनी बिल थकविले असतानाही नव्याने तेथे मीटर देण्यास वीज कंपनीची यंत्रणा उत्सुक असते. कारण त्यांचेही त्यात ‘चांगभलं’ होते.
महावितरण यंत्रणेचे कंत्राटदाराशी साटेलोटे
वीज कंपनीतील यंत्रणेचे मीना बाजार कंत्राटदारांशी साटेलोटे असल्यानेच आज लाखो रुपयांचे विद्युत बिल थकीत आहे. त्याच्या वसुलीसाठी मात्र प्रयत्न होताना दिसत नाही. मुळात ही वसुली करणार कुणाकडून हा प्रश्न आहे. कारण रेकॉर्डवर पहिल्यांदा दहा दिवसासाठी मैदान भाड्याने घेतलेल्या व्यक्तीचेच नाव आहे, पुढे ही नावे बदलली आहे. एका महिन्याचे किमान दोन लाख रुपयांचे विद्युत बिल होत असल्याचे सांगितले जाते. यावरून महावितरण कंपनीच्या थकबाकीचा आकडा किती मोठा असेल याचा अंदाज येतो. या प्रकरणी महावितरण कंपनीच्या तलावफैल तक्रार निवारण केंद्राशी संपर्क केला असता आझाद मैदानच्या मीना बाजारकडे कोणतीच विद्युत बिलाची थकबाकी नसल्याचे ‘लोकमत’ला सांगण्यात आले. यावरून वीज कंपनीतील यंत्रणा व मीना बाजारच्या कंत्राटदाराचे संबंध किती सलोख्याचे आहेत, हे स्पष्ट होते.