‘एमआयएम’ची यवतमाळात मोटरसायकल रॅली
By Admin | Updated: November 14, 2016 01:34 IST2016-11-14T01:34:27+5:302016-11-14T01:34:27+5:30
नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमांना आता रंग चढू लागला आहे. रविवारी एमआयएमच्या

‘एमआयएम’ची यवतमाळात मोटरसायकल रॅली
यवतमाळ : नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार मोहिमांना आता रंग चढू लागला आहे. रविवारी एमआयएमच्या (आॅल इंडिया मजलीस-ए-इत्तेहद-उल-मुस्लीमिन) उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी थेट पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदोद्दीन ओवेसी शहरात दाखल झाले. तर पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोटरसायकल रॅली काढण्यात आली. यावेळी ‘नारा-ए-तकबीर अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी लक्ष वेधून घेतले.
यवतमाळ नगरपालिकेच्या आखाड्यात पहिल्यांदाच एमआयएम पक्षाने उमेदवार उतरविले आहेत. त्यांच्या प्रचार मिरवणुकीसाठी खासदार असदोद्दीन ओवेसी आणि आमदार इम्तियाज जलील शहरात दाखल झाले. मात्र प्रकृती बिघडल्याने खासदार ओवैसी रॅलीमध्ये सहभागी होऊ शकले नाही. परंतु, आमदार इम्तियाज जलील आणि पक्षाचे राज्याध्यक्ष सैयद मोईन यांनी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला.
एमआयएमचे जिल्हाध्यक्ष शाज अहमद यांनी आमदार इम्तियाज जलील, राज्याध्यक्ष सैयद मोईन यांचे स्वागत केले. दुपारी २ वाजता कळंब चौकातून रॅलीला सुरूवात झाली. ‘देखो देखो कौन आया.. एमआयएम का शेर आया’, ‘नारा-ए-तकबीर अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देत मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली. रॅलीमध्ये पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुनंदा वालदे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे सुनिल पुनवटकर, एमआयएमचे अंजुम इनामदार, राजू मलीक, अखनर शारिक, एजाज जोश, नाजीर अहेमद, अशोक शेंडे, संजय बोरकर, रवी पाटील, गुणवंत गणवीर, धनंजय गायकवाड, घनश्याम जोगळेकर, धवने आणि बहुसंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कळंब चौकातून निघालेली रॅली आंबेडकर चौक, नगरपरिषद शाळा क्रमांक पाच, अप्सरा टॉकीज चौक, स्टेट बँक चौक, पोस्ट आॅफीस चौक अशा मार्गाने बसस्थानक चौकात पोहोचली. यावेळी एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी बसस्थानक चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन केले. त्यानंतर प्रचंड घोषणाबाजी करीत ही रॅली इंदिरा गांधी मार्केट, जयहिंद चौक, मेन लाईन, तहसील चौक अशा मार्गाने पुन्हा कळंब चौकात पोहोचली. या ठिकाणी रॅलीचे विसर्जन केल्यानंतर एमआयएमच्या स्थानिक कार्यालयाचे आमदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले. (स्थानिक प्रतिनिधी)