अतिक्रमणाच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार
By Admin | Updated: January 17, 2017 01:31 IST2017-01-17T01:31:59+5:302017-01-17T01:31:59+5:30
शहरात नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत संबंधित अधिकारी लाखो रूपये घेऊन भ्रष्टाचार करीत असल्याचा ...

अतिक्रमणाच्या नावावर लाखोंचा भ्रष्टाचार
मनसेचा आरोप : धनाढ्यांची घरे मोहिमेतून वगळली, उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
वणी : शहरात नगरपरिषदेतर्फे राबविण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेत संबंधित अधिकारी लाखो रूपये घेऊन भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप मनसेने सोमवारी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.
नगरपरिषदेने कायद्याची अंमलबजावणी न करता केवळ गोरगरिब जनतेच्या घराचे व दुकानाचे अतिक्रमण काढले. परंतु शहरातील श्रीमंत, राजकीय पुढारी, व्यापारी, दवाखाने तसेच आरोग्य विभागाच्या आवारात असलेल्या अवैैध धंदे प्रतिष्ठानच्या मालकाकडून लाखोंचा व्यवहार केला व त्यांना मोहिमेतून वगळण्यात आल्याचा आरोप या निवेदनातून करण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या नकाशानुसार कायदेशीररित्या निष्पक्ष अतिक्रमण मोहिम राबविण्यात यावी, संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे, येत्या आठ दिवसांत नगरपरिषदेच्या नकाशानुसार अतिक्रमण मोहिम न राबविल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनातून देण्यात आला. निवेदन देतेवेळी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजू उंबरकर व पदाधिकारी उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)