लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन मोहीम
By Admin | Updated: February 2, 2015 23:14 IST2015-02-02T23:14:29+5:302015-02-02T23:14:29+5:30
नागरिकांना दर्जेदार, उत्तम आणि त्वरित सुविधा प्राप्त करून देण्यासाठी लोकसहभागातून ग्रामपंचायत सूक्ष्म नियोजन मोहीम तालुक्यात राबविली जात आहे. विविध प्रकारची माहिती संबंधितांकडून

लोकसहभागातून सूक्ष्म नियोजन मोहीम
राळेगाव : नागरिकांना दर्जेदार, उत्तम आणि त्वरित सुविधा प्राप्त करून देण्यासाठी लोकसहभागातून ग्रामपंचायत सूक्ष्म नियोजन मोहीम तालुक्यात राबविली जात आहे. विविध प्रकारची माहिती संबंधितांकडून संकलीत करून त्या आधारे सुविधा पुरविल्या जाणार आहे.
या अंतर्गत सहायक प्रशिक्षकांचे प्रशिक्षण पंचायत समिती सभागृहात झाले. याशिवाय जिल्हा, तालुकास्तरावर यापूर्वीच विविध सहभागी घटकांचे प्रशिक्षण घेण्यात आले. पहिल्या टप्प्यात २३ ग्रामपंचायतीत २० ते २६ जानेवारी या काळात ही मोहीम राबविली. दुसऱ्या टप्प्यात १ ते ७ फेब्रुवारी दरम्यान २६ ग्रामपंचायतीत आणि उर्वरित ग्रामपंचायतीत ९ फेब्रुवारीपर्यंत मोहीम राबविली जाणार आहे.
प्रत्येक गावातील ग्रामस्तरावर कार्यरत कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहायक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनिस, आशा वर्कर, पाणीपुरवठा कर्मचारी, परिचारिका, आरोग्यसेवक, सहकारी सोसायटी सचिव आदींना या मोहिमेसाठी सक्रिय सहकार्य करण्याचे सूचित करण्यात आले आहे.
या मोहिमेंतर्गत कुटुंबातील सदस्यांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी गृहभेटी दिल्या जाणार आहे. विविध प्रकारची माहिती विचारून कुटुंब माहिती पत्रक तयार केले जाणार आहे. युवक, युवती, महिला, महिला बचत गट, पुरुष बचत गट, जागरूक नागरिक, शेतकरी आदींशी त्यांच्या विषयाशी संबंधित गटचर्चा करून माहिती घेतली जाणार आहे.
ग्रामपंचायती, ग्रामविकास समित्या, सोसायटी, शाळा, रुग्णालय, अंगणवाडी आदी ठिकाणी भेट देवून संबंधित अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आदींकडून विविध माहिती मिळविली जाणार आहे. गावातील आरोग्य, शिक्षण, पोषण, पिण्याचे पाणी, स्वच्छता, पायाभूत संरचना, गावात उपलब्ध संसाधने, शेतीसंदर्भातील विविध प्रश्नांवर आकडेवारी, सिंचन सुविधा आदी माहिती संकलित केली जाणार आहे. विविध प्रकाराच्या माहितीसोबत नकाशे, आराखडे तयार केले जाणार आहे. गावातील विविध नागरिकांच्या, संस्थांच्या, शेतकऱ्यांच्या भविष्यात काय आशा, आकांक्षा, अपेक्षा आहेत हे जाणून घेतले जाणार आहे. यासाठी बैठक, वॉर्ड सभा, महिला ग्रामसभा, ग्रामसभा, प्रभातफेरी, शिवारफेरी आदी जनजागृतीचे उपक्रम राबविले जाणार आहे. यासाठी तालुका प्रशासन कामाला लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)