पारा पोहोचला ४५.६ वर
By Admin | Updated: May 20, 2015 00:27 IST2015-05-20T00:27:58+5:302015-05-20T00:27:58+5:30
मंगळवारी अक्षरश: सूर्य आग ओकत होता. उन्हाच्या काहिलीने जीवाची लाहीलाही होत होती.

पारा पोहोचला ४५.६ वर
यवतमाळ : मंगळवारी अक्षरश: सूर्य आग ओकत होता. उन्हाच्या काहिलीने जीवाची लाहीलाही होत होती. यंदाच्या वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी ४५.६ अंश सेल्सीअस करण्यात आली. उन्हाचे चटके सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जाणवत होते. दुपारी तर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत होता.
यावर्षी उन्हाची तीव्रता तेवढी जाणवली नाही. ढगाळी वातावरण आणि अवकाळी पावसाने तापमानात तेवढी वाढ झाली नव्हती. मात्र गत आठवडाभरापासून सूर्य आग ओकायला लागला आहे. सोमवारी यवतमाळचे तापमान ४४ अंश सेल्सीअस नोंदविले गेले. मंगळवारी पारा ४५.६ अंशावर पोहोचला आहे. २०१३ मध्ये मे महिन्यात पारा ४६.८ अंशावर पोहोचला होता. त्यानंतर मंगळवारचे सर्वाधिक तापमान ठरले. सकाळी ८ वाजतापासूनच उन्हाच्या झळा बसायला सुरुवात झाली होती. ११ वाजताच्या सुमारास सूर्य आग ओकत असल्याचा भास होत होता. दुपारी तर जणू भट्टीत बसल्यासारखे वाटत होते. कुलरही गरम हवा फेकत होते. कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना उन्हाचे चटके जाणवत होते. अनेकांनी घरातच विश्रांती घेणे पसंत केले. सायंकाळी ७ वाजतानंतरही उष्ण झळा जाणवत होत्या. विदर्भातील हॉट शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुसदचेही तापमान होते. पुसदमध्ये अधिकृत तापमापी नसल्याने नेमके तापमान कळू शकत नाही. परंतु खासगी तापमापीवर पुसदचे तापमान ४७ अंश नोंदविल्याचे सांगण्यात आले. (नगर प्रतिनिधी)