कचरा वेचणाऱ्या हातावर सजणार मेहंदी
By Admin | Updated: September 30, 2016 02:52 IST2016-09-30T02:52:41+5:302016-09-30T02:52:41+5:30
पाठीवर दप्तराऐवजी कचऱ्याचे पोते अन् हातात मिळेल तो कचरा. गल्लीबोळात कचरा वेचणाऱ्या या हातांवर सजणार आहे ती निकाहची मेहंदी.

कचरा वेचणाऱ्या हातावर सजणार मेहंदी
बानू शेखचा २ आॅक्टोबरला निकाह : श्रमसाफल्याला जाकीरची आयुष्यभर साथ
यवतमाळ : पाठीवर दप्तराऐवजी कचऱ्याचे पोते अन् हातात मिळेल तो कचरा. गल्लीबोळात कचरा वेचणाऱ्या या हातांवर सजणार आहे ती निकाहची मेहंदी. बानूच्या श्रमसाफल्याला जाकीर आयुष्यभराची साथ देणार आहे. हा आगळावेगळा विवाह सोहळा गांधी जयंतीला २ आॅक्टोबर रोजी यवतमाळच्या श्री सत्यसाई क्रीडा रंजन सभागृहात संपन्न होणार असल्याची माहिती पत्रपरिषदेत प्राचार्य डॉ. प्रकाश नंदूरकर यांनी दिली.
बानू शेख गफ्फार शेख शफी असे परिस्थितीशी झुंजणाऱ्या तरुणीचे नाव. वयाच्या तिसऱ्या वर्षी पितृछत्र हरविले. घरात आई आणि दीड वर्षाची बहीण. आई जिनात १६-१६ तास कष्ट उपसायची. त्यामुळे ती कायमची आजारी पडली. शाळेत जाण्याच्या वयात बानूच्या पाठीवर उपजीविकेसाठी कचऱ्याचे पोते आले. लेखणीऐवजी हाती आला तो गल्लीबोळातील केरकचरा. दररोज पहाटे यवतमाळच्या रस्त्यावर ती केरकचरा गोळा करीत राहिली. तिला साथ मिळत होती लहान बहीण शमाची. अशाच संघर्षमय जगण्यात डॉ.प्रकाश नंदूरकरांची साथ मिळाली. शिक्षण सुरू झाले. दोघीही बहिणी दहावी-बारावी पास झाल्या. यवतमाळातच नर्सिंगचे प्रशिक्षण झाले. बानू घाटंजी तालुक्यातील भांबोरा येथे शासकीय सेवेत तर आईच्या प्रकृतीमुळे शमाने शासकीय नोकरी सोडली.
अशा या बानूच्या हातावर गांधी जयंतीला निकाहची मेहंदी रंगणार आहे. यवतमाळ तालुक्यातील रूईवाई येथील जाकीर खान हा टेलरिंगचा व्यवसाय करणारा तरुण तिला आयुष्याची साथ देणार आहे. संघर्षातून वाट काढणाऱ्या बानूच्या आयुष्यात आता आनंदाचे क्षण येत आहे. हा आनंद सोहळा यवतमाळकर तेवढ्याच उत्साहाने पार पाडण्याच्या तयारीत आहे. तिच्या संघर्षाला सलाम करण्यासाठी आणि तिचा प्रेरणामयी जीवनपट समाजापुढे आणण्यासाठी यवतमाळात भव्य विवाह सोहळा आयोजित आहे. २ आॅक्टोबर रोजी १०.३० वाजता सत्यसाई क्रीडा रंजनगृहात हा विवाह सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, पालकमंत्री संजय राठोड, ऊर्जा व पर्यटन मंत्री मदन येरावार, विधान परिषदेचे उपाध्यक्ष माणिकराव ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे, खासदार भावना गवळी, नगराध्यक्ष सुभाष राय, माजी आमदार पाशा पटेल, समाजसेवक शंकरबाबा पापळकर, जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह उपस्थित राहणार आहे. या विवाहासाठी समिती गठित करण्यात आली आहे. सामाजिक सद्भाव सोहळा पार पाडण्यासाठी अनेक हात आणि सामाजिक संघटना पुढे सरसावल्या असल्याचे पत्रपरिषदेत सांगण्यात आले.
(नगर प्रतिनिधी)