मजीप्रा, वृक्षतोड प्रकरणी कारवाईचे आदेश
By Admin | Updated: August 7, 2016 01:23 IST2016-08-07T01:23:11+5:302016-08-07T01:23:11+5:30
पदाचा गैरवापर करत अनेक अधिकारी, कर्मचारी गैरमार्गाचा अवलंब करतात. अशा प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी

मजीप्रा, वृक्षतोड प्रकरणी कारवाईचे आदेश
जिल्हाधिकारी : भ्रष्टाचार निर्मूलन समितीची बैठक, धरणांचे सिक्युरीटी आॅडीट
यवतमाळ : पदाचा गैरवापर करत अनेक अधिकारी, कर्मचारी गैरमार्गाचा अवलंब करतात. अशा प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी तसेच सर्वसामान्यांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी जिल्हास्तरावर प्राप्त भ्रष्टाचारांच्या तक्रारींवर त्वरीत कारवाई केली जावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिले. यावेळी अंजनखेड येथील जीवन प्राधिकरण योजनेतील भ्रष्टाचार, गोधणी व बोधगव्हाण येथील रस्त्याचे खोटे दानपत्र दाखवून भ्रष्टाचार, गोधणी येथील खदानीतून अवैध उत्खनन आदींबाबत प्राप्त तक्रारींवर चर्चा झाली. या सर्व तक्रारींवर योग्य कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले.
येथील महसूल भवनात जिल्हा भ्रष्टाचार समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, बांधकामचे अधीक्षक अभियंता शशिकांत सोनटक्के, कार्यकारी अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विनय ठमके आदी उपस्थित होते.
दारव्हा तालुक्याच्या पाळोदी येथील महिलेने केलेल्या तक्रारीवरून पाटबंधारे विभागाच्या काही अधिकाऱ्यांनी लाभ क्षेत्राचे खोटे प्रमाणपत्र दिल्याचे आढळून आले आहे. तसेच निम्न पैनगंगा प्रकल्पाच्या भूसंपादनात झालेल्या भ्रष्टाचारप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे योग्य कारवाईचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी बैठकीत दिले. यवतमाळ वनक्षेत्रातील अवैध वृक्षतोडीबाबत दाखल तक्रारीची सखोल चौकशी करून दोषी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यासोबतच बैठकीत विविध तक्रारींवर चर्चा करण्यात आली.
यावर्षी पर्जन्यमान जास्त होणार आहे. त्यामुळे अनेक धरणे यावर्षी पहिल्यांदाच भरण्याची शक्यता आहे. धरण शंभर टक्के भरल्यानंतर कोणत्याही प्रकारचा धोका होऊ नये यासाठी सर्व धरणांचे सुरक्षेच्यादृष्टीने सिक्सुरीटी आॅडीट करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी जलसंपदा विभागास दिले आहे. (वार्ताहर)