मेडिकलमधील उपचार महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 21:23 IST2017-12-26T21:23:11+5:302017-12-26T21:23:22+5:30
गरिबांसाठी उपचाराकरिता हक्काचे आणि परवडणारे ठिकाण असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयानेही शुल्कवाढ केली आहे. टप्प्याटप्प्याने आणखी काही तपासण्यांचे शुल्क वाढविले जाणार आहे.

मेडिकलमधील उपचार महागला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : गरिबांसाठी उपचाराकरिता हक्काचे आणि परवडणारे ठिकाण असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयानेही शुल्कवाढ केली आहे. टप्प्याटप्प्याने आणखी काही तपासण्यांचे शुल्क वाढविले जाणार आहे. झालेली शुल्कवाढ रद्द करावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवी ढोक, विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष विक्की राऊत, उपाध्यक्ष पारस अराठे आदींनी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांना निवेदन सादर केले. शासन निर्णयानुसार शुल्क वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र गरिबांना जुन्याच दरात ही सेवा मिळावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे ओपीडी कार्ड शुल्क पूर्वी दहा रुपये होते. आता २० रुपये करण्यात आले आहे. सिटी स्कॅन, सोनोग्राफी, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया, एक्स-रे, रक्त तपासणी शुल्कातही पुढे वाढ केली जाणार आहे. ही बाब अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील नागरिक आर्थिक अडचणीत आला आहे. अपुरा पाऊस, नापिकी आदी कारणांमुळे शेतकरी, शेतमजुरांची आर्थिक कोंडी झाली आहे. खासगीत उपचार कठीण होऊन बसले असताना सरकारी रुग्णालयानेही शुल्क वाढ केली आहे. त्यांना मोठा आर्थिक फटका बसतो आहे. गरिबांच्या बिकट आर्थिक परिस्थितीचा विचार करून शुल्कवाढ मागे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदन देताना नगरसेवक बबलू देशमुख, मुकेश देशभ्रतार, बाळासाहेब गिरपुंजे, राहुल राऊत, कदीर मिश्रा, गुणवंतराव डोळे, सुरेश लोहाणा, गोलू भगत, हरिद्वार खडसे, चंद्रशेखर गायकी, बबलू राठोड, रमेश भिसनकर, संजय गायधने, सुनील कांबळे, सुहास सरगर, श्रीकांत आडे, चिंतामण पायघन, चरणदास बारसे, कृष्णा पुसनाके, रवी चव्हाण, पंजाबराव चव्हाण, आशीष ढोले, समीर कुलकर्णी, आनंदराव मेटकर, बंटी इंगोले, बाबू अन्सारी, भारत गजभिये, दिनकर जाधव, मंगेश देवकते, सैयद जुनेद, विशाल डेहनकर आदींची उपस्थिती होती.