नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा
By Admin | Updated: July 31, 2014 00:15 IST2014-07-31T00:15:59+5:302014-07-31T00:15:59+5:30
विदर्भात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील नगरपरिषदेवर आज बुधवारी आपला झेंडा फडकविला आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोनही पदे काबीज करून मनसेने नगरपरिषदेची सत्ता

नगरपरिषदेवर मनसेचा झेंडा
वणी : विदर्भात सर्वप्रथम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने येथील नगरपरिषदेवर आज बुधवारी आपला झेंडा फडकविला आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोनही पदे काबीज करून मनसेने नगरपरिषदेची सत्ता प्रथमच हस्तगत केली आहे.
अडीच वर्षांपूर्वी झालेल्या नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २५ सदस्यांपैकी मनसेचे सर्वाधिक आठ नगरसेवक विजयी झाले होते. त्या खालोखाल सात अपक्ष, चार राष्ट्रवादी, तीन शिवसेना, दोन कॉंग्रेस आणि एक नगरसेवक भाजपाचा विजयी झाला होता. सर्वाधिक आठ सदस्य निवडून येऊनही नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मनसेला चाट बसली होती. त्यावेळी राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, भाजप आणि चार अपक्षांनी एकत्रित येत नगरपरिषदेवर शिवसेनेचा झेंडा फडकविला होता.
गेल्या अडीच वर्षाच्या काळात नगरपरिषदेत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. यावेळी नगराध्यक्ष पद अनुसूचित जातीच्या महिला सदस्याकरिता आरक्षित होते. या प्रवर्गातील करुण कांबळे आणि प्रिया लभाने या दोनच उमेदवार होत्या. त्यात कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांकडून, तर लभाने यांनी मनसेकडून उमेदवारी दाखल केली होती. मात्र लभाने यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप असल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला होता. परिणामी ही निवडणूक लांबणीवर पडली होती. दरम्यान लभाने यांनी आयुक्तांकडे अपिल केले होते. तेथे आयुक्तांनी त्यांचा अर्ज वैध ठरविल्यानंतर आज बुधवारी नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोनही पदांसाठी निवडणूक घेण्यात आली.
उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शिवानंद मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. विहित मुदतीत कुणीही अर्ज मागे न घेतल्याने कांबळे व लभाने यांच्यात लढत झाली. त्यावेळी सभागृहात २४ सदस्य उपस्थित होते. त्यापैकी २0 सदस्यांनी लभाने यांच्या बाजूने हात उंचावले, तर शिवसेनेचे तीन आणि एक अपक्ष, असे चार सदस्य तटस्थ राहिले. त्यामुळे लभाने यांची २0 विरुद्ध शून्य मताने नगराध्यक्षपदी निवड झाल्याचे मिश्रा यांनी घोषित केले.
यानंतर उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या पदासाठी मनसेकडून अशोक बुरडकर, गटनेते अभिजित सातोकर, धनंजय त्रिंबके आणि विरोधकांतर्फे कॉंगेसचे कैसर पटेल आणि धनराज भोंगळे यांनी अर्ज दाखल केले होते. मात्र त्यापैकी बुरडकर वगळता सर्वांनी उमेदवारी मागे घेतल्याने बुरडकर यांची अविरोध निवड करण्यात आली आहे. नगराध्यक्ष आणि उपाध्यक्ष ही दोनही पदे काबीज करून मनसेने विदर्भात पहिल्यांदाच नगरपरिषदेची सत्ता ताब्यात घेतली आहे. मनसेने व्यूहरचना करून ही नगरपरिषद आपल्या ताब्यात घेण्यात अखेर यश प्राप्त केले. त्यानंतर मनसेने जल्लोष केला. (कार्यालय प्रतिनिधी)