नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला
By Admin | Updated: October 11, 2015 00:40 IST2015-10-11T00:40:59+5:302015-10-11T00:40:59+5:30
येथील नगराध्यक्षपदावरून सुरू असलेला तिढा अखेर दीड महिन्यानंतर शनिवारी सुटला. अपक्ष नगरसेविका करूणा रवींद्र कांबळे यांची नगराध्यक्षपदी निवड होऊनही निकाल ...

नगराध्यक्षपदाचा तिढा सुटला
कांबळे पदावर आरूढ : लभाने यांनी घेतली उच्च न्यायालयातील याचिका मागे
वणी : येथील नगराध्यक्षपदावरून सुरू असलेला तिढा अखेर दीड महिन्यानंतर शनिवारी सुटला. अपक्ष नगरसेविका करूणा रवींद्र कांबळे यांची नगराध्यक्षपदी निवड होऊनही निकाल न्यायालयाच्या निर्देशानुसार राखून ठेवण्यात आला होता. अपिलार्थी प्रिया लभाने व प्रमोद निकुरे यांनी उच्च न्यायालयातून आपली याचीका मागे घेतल्याने नगराध्यक्षपदी करूणा कांबळे यांची निवड झाल्याची घोषणा शनिवारी करण्यात आली.
मागील दीड वर्षांपासून प्रिया लभाने नगराध्यक्ष म्हणून कार्यरत होत्या. सुरूवातीला त्यांना नगरसेवकांनी बहुमताने साथही दिली. मात्र या नगरसेवकांचा प्रिया लभाने यांनी विश्वासघात केल्याचा आरोप करून २० नगरसेवकांनी त्यांच्याविरूद्ध अविश्वास ठराव आणून त्यांना पायउतार केले. लभाने यांनी १२ मे, २९ मे व २३ जून रोजी झालेल्या सर्वसाधारण व विशेष सभेचे कार्यवृत्त अद्याप लिहिले नाही. त्यामुळे शहरातील विकास कार्यांना सुरूवात करता येत नव्हती. तसेच लभाने यांचा प्रशासनावर अंकुश नसल्याचा आरोपही अविश्वासाच्या वेळी करण्यात आला होता. त्यांच्या कार्यकाळात रजानगर येथील दारू भट्टीला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले. शेत सर्व्हे नंबर १०६ मध्ये नगरपालिकेच्या मालमत्तेवर गॅस गोडाउनचे बांधकाम सुरू असताना कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तसेच येथील एका बिल्डरला बांधकामाची परवानगी देण्यात आली. या सर्व बाबींत लभाने यांनी मोठा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे प्रिया लभाने यांच्याकडून अपेक्षित असलेली विकास कामे केली जात नव्हती.
शनिवारी करूणा कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारत पत्रकार परिषद घेऊन वरील सर्व आरोपांसह काही गंभीर आरोपही केले. प्रिया लभाने जनता व नगरसेवकांना असभ्य वर्तणूक देऊन वारंवार अपमानीत करीत होत्या, असे कांबळे यांनी सांगितले. अविश्वास ठराव पारित होऊनही प्रिया लभाने यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर ंखंडपीठात याचीका दाखल केली. त्यात त्यांनी अविश्वास ठरावासाठी घेण्यात आलेली सभा अवैध ठरविण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयीन बाबींमध्ये एक महिना गेल्यानंतर आता अचानकपणे प्रिया लभाने यांनी याचीका मागे घेतली आहे. ही याचिका मागे का घेण्यात आली, याचे गुढ मात्र अद्यापही कुणालाच कळले नाही. तथापि आजपासून नगरपरिषदेला पूर्णवेळ नगराध्यक्ष मात्र मिळाला. उर्वरित एक वर्षाच्या काळात आपण सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन अधिकाधिक विकास कामे करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे करूणा कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)