आरक्षणाने बदलणार गणित
By Admin | Updated: January 20, 2017 02:58 IST2017-01-20T02:58:02+5:302017-01-20T02:58:02+5:30
बहुप्रतिक्षीत पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जिल्हा मुख्यालयात झाली. या सोडतीने पंचायत समितीचे राजकारण बदलणार आहे.

आरक्षणाने बदलणार गणित
पंचायत समिती : दिग्रस-उमरखेड सर्वसाधारण, महागाव एससी, पुसद नामाप्र
पुसद : बहुप्रतिक्षीत पंचायत समितीच्या आरक्षणाची सोडत शुक्रवारी जिल्हा मुख्यालयात झाली. या सोडतीने पंचायत समितीचे राजकारण बदलणार आहे. काही ठिकाणी इच्छुकांचा हिरमोड तर काही ठिकाणी नामीसंधी आली आहे. जिल्हा परिषदेच्या आरक्षणानंतर सभापतीपदावर डोळा ठेऊन असणाऱ्यांनी आता पंचायत समितीचा नाद सोडण्याची तयारी चालविली आहे.
पंचायत समिती सभापतीपदाच्या आरक्षणाकडे उमरखेड आणि पुसद उपविभागातील राजकीय नेत्यांचे लक्ष लागले होते. बहुप्रतिक्षीत या आरक्षणाची सोडत गुरूवारी काढण्यात आली. त्यात पुसद पंचायत समितीचे सभापतीपद नागरिकांचा मागास प्रवर्ग, महागाव अनुसूचित जाती तर दिग्रस आणि उमरखेड सर्वसाधारणसाठी सुटले आहे. पुसद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या पंचायत समितीवर गेल्या कित्येक वर्षापासून राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. आता भाजपा आणि शिवसेनेने जोरदार तयारी चालविली आहे. काँग्रेसही या ठिकाणी तगडे उमेदवार देण्याच्या तयारी आहेत. अशा स्थितीत नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या गणात इच्छुकांची मोठी गर्दी होणार आहे. अनेक जण सभापती होण्यासाठी इच्छुक दिसत आहे.
महागाव पंचायत समितीचे सभापतीपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित झाल्याने अनेक दिग्गजांचा येथे हिरमोड झाला आहे. तब्बल १९ वर्षानंतर अनुसूचित जातीसाठी आरक्षण निघाले आहे. दिग्रस आणि उमरखेड पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण निघाले आहे. यामध्ये येथील प्रत्येक गणातच चुरस राहणार आहे.
अनेक दिग्गजांचे जिल्हा परिषद गट आरक्षित झाले आहे. त्यामुळे त्यांनी पंचायत समितीच्या सभापतीपदावर डोळा ठेऊन मोर्चे बांधणी सुरू केली होती. पंरतु आता महागाव आणि पुसदमधील नेत्यांची यामुळे अडचण होत आहे. महागावातील अनेकांनी तर आता पंचायत समितीचाही नाद सोडून देण्याची तयारी चालविली आहे. आता आरक्षण सोडतीनंतर सर्व पक्ष पंचायत समितीच्या आरक्षणानुसार उमेदवारांची चाचपणी करीत आहे. (लोकमत चमू)