फुलसावंगी दरोड्याचा ‘मास्टर मार्इंड’ बाबर पोलिसांना शरण
By Admin | Updated: February 2, 2016 02:07 IST2016-02-02T02:07:07+5:302016-02-02T02:07:07+5:30
येथील कापूस व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या २७ लाखांच्या धाडसी दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबर खान शहादत खान (३०) याने सोमवारी सकाळी ६ वाजता महागाव पोलिसांपुढे शरणागती पत्करली.

फुलसावंगी दरोड्याचा ‘मास्टर मार्इंड’ बाबर पोलिसांना शरण
२३ लाखांच्या जप्तीचे आव्हान : आतापर्यंत चार आरोपी ताब्यात
महागाव : येथील कापूस व्यापाऱ्याच्या घरी झालेल्या २७ लाखांच्या धाडसी दरोड्याचा मुख्य सूत्रधार बाबर खान शहादत खान (३०) याने सोमवारी सकाळी ६ वाजता महागाव पोलिसांपुढे शरणागती पत्करली. तो नांदेड, दिल्ली, राजस्थान मार्गे महागावात पोहोचल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या चोरीतील मुद्देमाल आणि इतर आरोपींना पकडणे पोलिसांना शक्य होणार आहे. याप्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून ३ लाख ७७ हजार रुपये रोखही जप्त केली आहे. यातील आणखी २३ लाखांच्या रोकड जप्तीचे आव्हान पोलिसांपुढे आहे.
फुलसावंगी येथील कापूस व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्या घरी धाडसी दरोडा पडला होता. चोरट्यांनी २७ लाख रोख आणि दोन तोळे ऐवज लंपास केला होता. या दरोड्यातील आरोपी शोधण्याचे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. दरम्यान, ‘लोकमत’ने यात बाबर टोळीचा हात असल्याचा संशय व्यक्त केला होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला होता. मात्र सुरुवातीला आरोपींचा थांगपत्ता लागत नव्हता. दरम्यान, महागाव पोलिसांनी मुंबई येथून अयाजोद्दिन ऊर्फ लखू आयसोद्दिन नवाब (२०) याला अटक केली होती. त्याने दिलेल्या माहितीवरून अशफाक खान शहादत खान याला ताब्यात घेवून त्याच्या शेतातून तीन लाख ७७ हजार रुपये जप्त करण्यात आले होते. मात्र या टोळीचा सूत्रधार बाबर पोलिसांच्या हाती लागत नव्हता. आरोपीच्या अटकेसाठी फुलसावंगी येथून व्यापाऱ्यांचा दबावही वाढत होता. तर पोलिसांनी बाबरच्या नातेवाईकाला पोलीस ठाण्यात चौकशीकरिता बोलावून घेतले होते. याची माहिती बाबरला मिळताच तो महागाव ठाण्यात पोहोचला. फुलसावंगी येथून नांदेड, पुणे, हैदराबाद, दिल्ली, राजस्थान यासह गोव्यातही जावून आल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली आहे. बाबर हा हिस्ट्रीसिटर असून महागाव पोलीस ठाण्यात त्याच्यावर चोरीचे दोन गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे या धाडसी चोरीतील तपास सुकर झाला आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार प्रकाश शेळके, दुय्यम ठाणेदार एस.डी. गोसावी तपास करीत आहेत. (शहर प्रतिनिधी)