शहीद स्मारक अडगळीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 21:55 IST2018-08-08T21:54:09+5:302018-08-08T21:55:16+5:30
येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.

शहीद स्मारक अडगळीत
गजानन अक्कलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
कळंब : येथील इंदिरा गांधी चौकात असलेले शहीद स्मारक ५० वर्षांपासून आजही दुर्लक्षित आहे़ स्मारकाचे सौंदर्यीकरण करण्यात यावे, अशी गावकऱ्यांची अनेक वर्षांपासूनची मागणी आहे़ स्मारकावरुन राजकारण करण्यापलीकडे एकाही राजकीय पक्षाचे काम पुढे सरकले नाही.
विद्यमान उपनगराध्यक्ष मनोज काळे यांनी हा विषय विरोधी पक्षात असताना अनेकदा जोरदारपणे लाऊन धरला होता. उपोषणाचेही हत्यार त्यांनी उपसले होते. त्यामुळेच ग्रामपंचायत अस्तित्वात असताना मागासक्षेत्र अनुदान निधीतून स्मारकासाठी निधीची तरतूद करण्यात आली़ परंतु मागील दहा वर्षांपासून स्मारक बांधकामाला मुहूर्तच सापडलेला नाही़
दुसरीकडे स्मारक समिती नेमणाºयांनी समितीत असण्यातच धन्यता मानली. त्यापुढे त्यांचे पाऊल सरकलेच नाही. तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होती. आता शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष सत्तेत आहे. महत्वाचे म्हणजे ज्यांनी हा विषय सातत्याने उपस्थित केला तेच मनोज काळे आता उपनगराध्यक्ष आहे. त्यांनी सत्ता आली तेव्हापासून शहीद स्मारकाचा विषय बाजूला ठेवला. विरोधी पक्षात असताना शहीद स्मारकासाठी रान उठविणारेच आता सत्तेत असूनही तोंड उघडायला तयार नाही, ही शोकांतिका आहे.
देश पारतंत्र्यात असताना तालुक्यातील वीरांनी घरावर तुळशीपत्र ठेऊन इंग्रज राजवटीच्या विरोधात लढ्यात उडी घेतली़ यामध्ये रामभाऊ महादेव माळी़, वासूदेव दाजीबा आष्टीकर, महादेव शिवराम माळी व चंपत मराठा या चौघांना वीरमरण आले़ त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ येथील इंदिरा गांधी चौकात १९७३ साली शहीद स्मारक उभारण्यात आले़ परंतु काळाच्या ओघात याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले़ वास्तविक शहीद स्मारकांचे सौंदर्यीकरण व स्मृती जपण्याची जबाबदारी नगरपंचायतची आहे़ मागील ५० वर्षात मंत्री, खासदार, आमदार व इतर लोकप्रतिनिधींनी स्मारकांच्या सौंदर्यीकरणासाठी अनेकदा आश्वासन दिले़ परंतु शब्द पाळला नाही, ही वास्तविकता आहे.