यवतमाळातील पुरणपोळीच्या पाहुणचाराने माहेरवाशिणी झाल्या तृप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2017 12:56 IST2017-11-17T12:43:04+5:302017-11-17T12:56:04+5:30
खूप वर्षांनी एकत्र आलेल्या माहेरवाशिणींनी पुरणपोळीचा आस्वाद घेत सुखदु:खाच्या गप्पा करण्याचा योग येथील हातगावात पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेनिमित्त जुळून आला.

यवतमाळातील पुरणपोळीच्या पाहुणचाराने माहेरवाशिणी झाल्या तृप्त
आॅनलाईन लोकमत
यवतमाळ : खूप वर्षांनी एकत्र आलेल्या माहेरवाशिणींनी पुरणपोळीचा आस्वाद घेत सुखदु:खाच्या गप्पा करण्याचा योग येथील हातगावात पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेनिमित्त जुळून आला.
यवतमाळ जिल्ह्यातल्या हातगाव तसं दीड हजार लोकवस्तीचं गाव. माहेरवाशिणींची गर्दी झाली. प्रत्येक माहेरवाशीण आपल्यासोबत शिकत असलेल्या मैत्रिणीला शोधत होती. किती वर्षांनी भेटली गं? खूपच बदलली गं? मुलं बाळं किती? दे तुझा नंबर? अशा किती तरी गोष्टी करत माहेरवाशिणींनी दारव्हा तालुक्यातील हातगाव येथे पुरणपोळीचा पाहुणचार घेतला आणि तृप्त मनाने आपल्या सासरी रवाना झाल्या.
निमित्त होते पंचकृष्ण समाज प्रबोधन व्याख्यानमालेनिमित्त माहेरवाशिणींच्या पाहुणचाराचे. दारव्हा तालुक्यातील हातगाव येथे या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गावातील सर्व विवाहित मुलींना सोहळ्याला बोलावून त्यांना साडी-चोळी देत पुरणपोळीचा पाहुणचार दिला. या सोहळ्याने अनेकांची मने जिंकली. या कार्यक्रमाची संकल्पना मांडली त्यावेळी कोणत्याही पालकाने दिवाळीला आपल्या मुलीला बोलाविले नाही. १५ नोव्हेंबरला कार्यक्रमाच्याच दिवशी येण्याचे ठरले. यासाठी आयोजकाने प्रत्येक माहेरवासिनीला संपर्क साधून कार्यक्रमाला येण्याची विनंती केली. कार्यक्रमाच्या दिवशी या माहेरवाशिणी सोहळ्यात उपस्थित झाल्या. ७० वर्षांच्या माहेरवाशिणी या सोहळ्यात दिसत होत्या. त्या गावात बालपण गेले, तेथे खेळल्या, तेथील मैत्रिणी एकत्र मिळणे कठीण. परंतु या सोहळ्याने सर्व मैत्रिणींना एकत्र आणले. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. जीवाभावाच्या मैत्रिणी इतक्या वर्षानंतर पाहुन अनेकींच्या डोळ्यात अश्रू तरळले. असा हा सोहळा अंत:करणात साठवून त्या पुन्हा सासरी निघाल्या तेव्हा एकमेकींच्या गळ्यातगळा पडून अक्षरश: रडल्या आणि गावानेही आपले अश्रू अलगद टिपले.