रमजान सुरू होताच बाजारपेठ फुलली
By Admin | Updated: June 17, 2016 02:51 IST2016-06-17T02:51:38+5:302016-06-17T02:51:38+5:30
रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध पदार्थ विक्रीसाठी आलेले असून रमजान महिन्याला प्रारंभ होताच बाजारपेठेत रौनक आली आहे.

रमजान सुरू होताच बाजारपेठ फुलली
उत्साहाचे वातावरण : लहानांपासून वयोवृद्ध करीत आहेत रोजा
पुसद : रमजानच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठेत विविध पदार्थ विक्रीसाठी आलेले असून रमजान महिन्याला प्रारंभ होताच बाजारपेठेत रौनक आली आहे. तसेच मुस्लिम बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे.
रमजान या पवित्र महिन्यात रोजा म्हणजे उपवास केला जातो. रोजा हा शारीरिक, मानसिक व आत्मशुद्धीसाठी उपयुक्त असतो. दिवसभर काहीही सेवन न करता उपवास केल्याने शरीरातील उष्णता वाहून मेद धातूचा नाश होतो. त्यामुळे शरीरातील अनावश्यक चरबीचे प्रमाण कमी होवून शरीरशुद्धी होण्यास मदत मिळते. महिनाभर रोजा, नमाज व जकात अदा केल्यास काया, वाचा व मनेंद्रिये शुद्ध होवून पवित्रता लाभते. मानवातील चांगल्या गुणांची वृद्धी होवून जीवन यशस्वी होते. म्हणूनच इसलाममध्ये रोजाला धार्मिकदृष्ट्या महत्त्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खानपान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी धर्मबाह्य मानले जाते. एक प्रकारे आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लिम बांधव व्रतबंधन पाळतात. रमजान महिन्यातील २४ तासांचा प्रत्येक दिवस जणू प्रशिक्षणाच असल्याचे मानले जाते. त्यानंतरच नमाज फजर, जोहर व असर नंतर मागरिब केला जातो. त्यानंतरच रोजा (इफ्तार) सोडतात. ईशा आणि तराबीची नमाज ही पठाण करतात. वयाच्या सातव्या वर्षापासून ते वयोवृद्धापर्यंत हा रोजा केला जातो. घरोघरी कुराणाचे पठणही होते. त्यामुळे ७ जून पासून शहरातील मुस्लिम बांधवांत आनंदाचे वातावरण पाहावयास मिळत आहे.
(तालुका प्रतिनिधी)
खरेदीसाठी रात्री उशिरापर्यंत गर्दी
पुसदच्या बाजारपेठेत रमजान निमित्त विविध पदार्थ विक्रीस आले आहे. या पदार्थांची खरेदी करण्यासाठी नागरिक रात्री उशिरापर्यंत गर्दी करून असतात. फेनी, खुरमा यासह विविध खाद्यपदार्थ आणि कपडे, अत्तर आदी वस्तू मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहे. या बाजारामुळे शहरात रौनक आली असून गर्दीने बाजारपेठेतील रस्ते फुललेले दिसून येत आहे.