ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
By Admin | Updated: July 7, 2016 02:29 IST2016-07-07T02:29:02+5:302016-07-07T02:29:02+5:30
मंगळवारी चंद्र दर्शन न झाल्याने बुधवारी साजरी होणारी ईद आता गुरुवारी उत्साहात साजरी होणार आहे.

ईदच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी
चाँदरात मुबारक : इदगाह मैदानावर नमाज
यवतमाळ : मंगळवारी चंद्र दर्शन न झाल्याने बुधवारी साजरी होणारी ईद आता गुरुवारी उत्साहात साजरी होणार आहे. ईदची जय्यत तयारी झाली असून खरेदीसाठी बुधवारी बाजारात मोठी गर्दी झाली होती.
रमजान ईदची तयारी करण्यासाठी एक दिवसाचा अतिरिक्त वेळ मिळाल्याने ग्राहकांनी तुंबळ गर्दी केली होती. कापड दुकानात साड्यांच्या खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. या सोबतच तरुणी आणि महिलाही बाजारपेठेत वेगवेगळ्या वस्तू खरेदी करीत दिसत होत्या. बांगड्या, स्प्रे, अत्तर, झुमके, अंगठ्या आदी खरेदी करण्याकडे सर्वांचा भर होता. यासोबत सुकामेवा, फेण्या व इतर खाद्य पदार्थांचीही खरेदी केली जात होती. खेळणे, सजावटी साहित्य खरेदी करण्यासाठी बच्चे कंपनी हट्ट धरुन बसली होती. ईदचा नमाज अदा करण्यासाठी खास टोप्याही बाजारात ग्राहकांना आकर्षित करीत होत्या. समाजातून गोळा झालेले दान ईदच्या आदल्या दिवशी म्हणजे चाँदरात मुबारकला वितरित करण्यात येते. धान्य, कपडा, पैसा, सुकामेवा आदी साहित्य जकातमधून जमा करण्यात आले ते वितरित करण्यात आले. ईदची विशेष नमाज गुरुवारी जामा मशिदीचे इमाम याकुब मौलाना पार पाडणार आहे. (शहर वार्ताहर)