‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत ‘मार्जीन’चा घोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 12:25 PM2020-06-03T12:25:35+5:302020-06-03T12:28:40+5:30

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे.

Margin mix in CCI's cotton procurement | ‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत ‘मार्जीन’चा घोळ

‘सीसीआय’च्या कापूस खरेदीत ‘मार्जीन’चा घोळ

Next
ठळक मुद्देकोट्यवधींची उलाढालग्रेडर्स-जिनिंग-प्रेसिंग मालकांचे साटेलोटे

राजेश निस्ताने ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडिया (सीसीआय) मार्फत खरेदी केल्या जात असलेल्या कापसात ‘घट’च्या नावाखाली मोठी ‘मार्जीन’ ठेवली जात आहे. त्याआड कोट्यवधी रुपयांची ‘उलाढाल’ सुरू आहे. सीसीआय-पणन महासंंघाचे ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांच्या संगनमताने शेतकऱ्यांची लुबाडणूक आणि शासनाची फसवणूक सुरू आहे.
देशभरात सीसीआयमार्फत कापसाची खरेदी सुरू आहे. महाराष्ट्रात या खरेदीसाठी सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघ सीसीआयच्या दिमतीला आहे. कापसापासून निघणाऱ्या रूईमध्ये दाखविल्या जाणाऱ्या ‘घट’च्या माध्यमातून गैरव्यवहार होत आहेत. शासनाने शंभर किलो कापसापासून ३३ किलो ५०० ग्रॅम रूईची परवानगी दिली आहे. प्रत्यक्षात कापसापासून सुमारे ३५ किलो रूई निघतो आहे. प्रति क्विंटल दीड किलो रूईची ‘मार्जीन’ बहुतांश ठिकाणी ठेवली जात आहे. फरदड कापसातून तर प्रति क्विंटल ३६ किलोपर्यंत रूई निघत असल्याचे सांगितले जाते. रुईमधील प्रति क्विंटल दीड किलो ‘मार्जीन’च्या माध्यमातून हा घोटाळा करण्यासाठी ग्रेडर्स आणि जिनिंग-प्रेसिंग मालकांनी साखळी बनविली आहे. त्या माध्यमातून सर्वत्र कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केला जात आहे. शेतकऱ्यांचा कापूस ओला, कमी गुणवत्तेचा दाखवून त्याला कमी भाव दिले जात आहे. दुसरीकडे याच चांगल्या दर्जाच्या कापसातून अधिक रूई काढून प्रत्यक्षात शासनाला कमी दाखविली जात आहे. या माध्यमातून शासनाचीही कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली जात आहे.

महाव्यवस्थापक कार्यालयाची डोळेझाक
सीसीआयचे मुख्यालय दिल्लीत असून महाराष्ट्राचे मुंबईत आहे. औरंगाबाद व अकोला येथे सीसीआयचे महाव्यवस्थापक कार्यरत आहेत. या घोटाळ्याला या कार्यालयांमधूनही दुर्लक्ष करून हातभार लावला जात आहे. कापूस खरेदी दरम्यान जिनिंगला लागणाºया आगीही संशयास्पद असून त्यातच या खरेदीतील गौडबंगालाचे भक्कम पुरावे दडलेले आहेत.

महाराष्ट्रात एक कोटी गाठींंचा अंदाज
यंदाच्या हंगामात देशात तीन कोटी ७० लाख रुईगाठी तयार होऊ शकतील, एवढ्या कापूस उत्पादनाचा अंदाज आहे. त्यातील ९२ लाख ते एक कोटी १० लाख गाठी एकट्या महाराष्ट्राच्या असतील. गुजरात एक कोटी, राजस्थान-पंजाब व हरियाणा मिळून ६५ लाख गाठी, मध्यप्रदेश १८ ते २० लाख गाठी, आंध्रप्रदेश-तेलंगाणा ५५ लाख गाठी तर कर्नाटक-ओडिसा आदी राज्यांमिळून २२ ते २३ लाख गाठी होण्याचा अंदाज आहे.

गैरप्रकारात तेलंगाणा आघाडीवर
रूईगाठींमधील ‘मार्जीन’च्या माध्यमातून सीसीआयमध्ये सुरू असलेल्या घोटाळ्यात तेलंगाणा राज्य सर्वात आघाडीवर आहे. त्या खालोखाल महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात ग्रेडर व जिनिंग यांच्या मिलिभगतमधून हा घोटाळा सुरू आहे. सीसीआयमधील या रूई ‘मार्जीन’ घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी झाल्यास यातील ‘वास्तव’ पुढे येईल.

Web Title: Margin mix in CCI's cotton procurement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cottonकापूस