मारेगाव तालुक्याचा औद्योगिक विकास रखडला, बेरोजगारी वाढली

By Admin | Updated: May 9, 2014 01:18 IST2014-05-09T01:18:24+5:302014-05-09T01:18:24+5:30

मारेगाव तालुक्याचा औद्योगिक विकास रखडला आहे. या विकासाला चालना देण्यासाठी पिसगाव येथे ब्रिटीश काळापासून प्राथमिक अवस्थेतच बंद असलेल्या कोळसा खाणीचे काम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.

Maregaon taluka's industrial development stalled, unemployment increased | मारेगाव तालुक्याचा औद्योगिक विकास रखडला, बेरोजगारी वाढली

मारेगाव तालुक्याचा औद्योगिक विकास रखडला, बेरोजगारी वाढली

बोटोणी : मारेगाव तालुक्याचा औद्योगिक विकास रखडला आहे. या विकासाला चालना देण्यासाठी पिसगाव येथे ब्रिटीश काळापासून प्राथमिक अवस्थेतच बंद असलेल्या कोळसा खाणीचे काम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मारेगाव तालुक्यातील बेरोजगारीने त्रस्त असलेल्या युवकांना अद्याप दिलासा मिळाला नाही. तालुक्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने विकास रखडला आहे. परिणामी केवळ काळ्या मातीशी इमान राखून शेतीवरच सर्वांना गुजराण करावी लागत आहे. आता सुपिक आणि उपजाऊ शेती कोळसा खाणीत जाईल म्हणून शेतकर्‍यांना चिंता सतावत आहे. मात्र तरीही पिसगाव येथील कोळसा खाण सुरू करण्याची मागणी होत आहे.
पिसगाव येथे कोळसा खाण सुरू झाल्यास तालुक्याच्या औद्योगिकीकरणात भर पडणार आहे. सोबतच एमआयडीसीत रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोळसा खाणीमुळे पूरक व्यवसाय, कोळशावर आधारीत उद्योगधंदे सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मारेगाव तालुक्याच्या विकासाकरिता हा मैलाचा दगड ठरणार आहे. विकासाच्या दृष्टीने औद्योगिक क्षेत्रात मारेगाव तालुक्याला चालना मिळण्याचे संकेत आहे. पिसगाव येथील कोळसा खाणीसाठी लागणार्‍या लगतच्या चिंचाळा, पाथरी, पांढरकवडा, आकापूर, पहापळ येथील जवळपास तीन हजार १३0 एकर ७५७ आर क्षेत्रातील जमिनीत अर्थात एक हजार २६७ हेक्टर क्षेत्रातील जमिनीच्या भूगर्भात मोठय़ा प्रमाणात दगडी कोळसा उपलब्ध आहे. ब्रिटीश काळात तेथे कोळसा खाण सुरू करण्यात आली होती. याबाबत अजूनही तेथे पुरावे पाहावयास मिळतात, असे तेथील ग्रामस्थ सांगतात. ब्रिटीश काळात सन १९३0 मध्ये पिसगाव येथे पोलीस ठाणे होते. त्याच काळात तेथे कोळसा खाण सुरू करण्यात आली होती. मात्र आता तेथे काहीच उरले नाही. पोलीस ठाण्याचे भग्नावेष तेथे पडलेल्या इमारतीवरून दिसून येतात. काही काळानंतर ब्रिटीशांनी तेथील पोलीस ठाणे मारेगावला स्थानांतरीत केले होते. तेव्हापासून मारेगाव येथेच पोलीस ठाणे कायम आहे. तेथील कोळसा खाण सुरू झाल्यास औद्योगीक विकासाला हातभार लागेल. (वार्ताहर)

Web Title: Maregaon taluka's industrial development stalled, unemployment increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.