मारेगाव नगरपंचायतच्या सीओंना हटवा!
By Admin | Updated: April 24, 2017 00:11 IST2017-04-24T00:11:22+5:302017-04-24T00:11:22+5:30
येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षाली राणे यांच्याविषयी सर्वपक्षीय सदस्यांत कमालिचा असंतोष आहे.

मारेगाव नगरपंचायतच्या सीओंना हटवा!
नगरसेवक एकवटले : समन्वय सभेत आमदारांना साकडे, बदलीची मागणी
मारेगाव : येथील नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी हर्षाली राणे यांच्याविषयी सर्वपक्षीय सदस्यांत कमालिचा असंतोष आहे. शनिवारी पार पडलेल्या समन्वय समितीच्या सभेत सर्व सदस्यांनी राणे यांना धारेवर धरीत प्रश्नांचा भडीमार केला. तसेच त्यांच्या बदलीची मागणी लावून धरली. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, उपविभागीय अधिकारी शिवानंद मिश्रा यांनी मुख्याधिकाऱ्यांना समज देत कामात सुधारण करण्याच्या सूचना दिल्या.
येथील मुख्याधिकारी हर्षाली राणे त्यांच्या कामाच्या पद्धतीमुळे त्या अल्पावधीतच वादग्रस्त ठरल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी विरोधी सदस्यांनी त्यांच्याविरुद्ध उपोषण केले होते. त्यासोबत नगरपंचायतीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढत तेरवीचा कार्यक्रमही केला होता. त्यामुळे नगरपंचायत जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली होती. जिल्हा प्रशासनाने उपोषणकर्त्यांच्या मागण्या मान्य करीत मुख्याधिकाऱ्यांना कामात सुधारणा करण्याचे आदेश दिले होते. परंतु हर्षाली राणे यांनी कामात सुधारणा न करता विकास कामे ठप्प केली आहे, असा सदस्यांचा आरोप आहे. शहराच्या विकासासाठी कोट्यवधी रूपये नगरपंचायतीकडे जमा आहे. परंतु राणे यांच्या अडेलतट्टू भूमिकेने शहरात समस्यांचा डोंगर उभा झाला आहे. त्यातच विकास कामांसाठी आलेला निधी परत जाण्याची भीती आहे. त्यामुळे विरोधकांसोबतच सत्ताधाऱ्यांनी राणे यांच्यावर रोष असून राणे यांची बदली करण्याची मागणी केली आहे. शनिवारी समन्वय समितीच्या सभेमध्ये आमदारांसमोर नगरपंचायतीचा विषय निघताच विरोधकासोबतच सत्ताधारी सदस्यांनीही राणे यांच्या कामाचा पाढा वाचला. हर्षाली राणे यांना मात्र सदस्यांच्या प्रश्नाची समाधानकारक उत्तरे देता आली नाही. मी नवीन आहे, असे उत्तर त्या देत होत्या. आ. बोदकुरवार व एसडीओ मिश्रा यांनी त्यांना समज दिली. यासंदर्भात हर्षाली राणे यांच्याशी संपर्क केला असता, मी सध्या रजेवर आहे. या विषयावर मला काहीही बोलायचे नाही, असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (शहर प्रतिनिधी)
सीओ हर्षाली राणे एक महिन्याच्या रजेवर
नगरपंचायतीचे सर्व सदस्य विरोधात गेल्याने आणि नगरपंचायतीमध्ये काम करणेही अवघड झाल्याने हर्षाली राणे ऐन उन्हाळ्यात एक महिन्याच्या रजेवर गेल्या आहेत. त्यांना मारेगाव येथे काम करायचे नसून त्या बदली करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती मिळाली आहे. शहरात पाणी टंचाई, नाली सफाई, पथदिवे आदी कामे एक महिन्यांपासून ठप्प आहे. आता मुख्याधिकारी रजेवर गेल्याने या समस्या उग्ररूप धारण करण्याची शक्यता आहे.