उमेदवारीसाठी अनेकांची पक्षांतराची तयारी
By Admin | Updated: October 22, 2016 01:47 IST2016-10-22T01:47:40+5:302016-10-22T01:47:40+5:30
नगरपरिषदेसाठी आरक्षण आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर होताच अनेकांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे.

उमेदवारीसाठी अनेकांची पक्षांतराची तयारी
नगरपरिषद निवडणूक : मतदारांच्या भेटीगाठींचा जोर वाढला
उमरखेड : नगरपरिषदेसाठी आरक्षण आणि त्यानंतर कार्यक्रम जाहीर होताच अनेकांनी आपआपल्या परीने मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. सत्तेसाठी पक्ष सोडून इतर पक्षात जाण्याच्याही वाटेवर अनेक जण आहेत. भाजपा, सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, बसपा आदींसह सर्वच पक्षातील व अपक्ष इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी पक्की समजून मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत सर्वत्र नगरपालिका निवडणुकीचे वातावरण व चर्चा दिसत होती. यावर्षी नगराध्यक्ष पदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे. अनुसूचित जातीसाठी उमरखेड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद राखीव असल्याने यावेळी जास्त स्पर्धा राहण्याची शक्यता आहे. सुरुवातीला शांत असलेले वातावरण चार दिवसांपासून तापले आहे. त्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी-कार्यकर्ते व अपक्षही कामाला लागले आहेत. नगराध्यक्षांची निवडणूक लढण्यासाठी मोठ्या प्रमाणात इच्छुकांची संख्या वाढली आहे. शहरातील दसरा, नवरात्र, शारदोत्सव आदी मंडळाला पदाधिकाऱ्यांनी यावेळी आवर्जुन भेट दिली. यातून जनसंपर्क वाढविण्यावर त्यांचा भर दिसून येत आहे. दिवसभर प्रत्येक घरी कुठल्या ना कुठल्या पक्षाचा उमेदवार भेट देत आहे. शहरातील मंदिर, वाचनालय, हॉटेल, पानटपरी, दुकाने, दवाखाना यासह अनेक ठिकाणी संभाव्य उमेदवार मतदारांच्या संपर्कासाठी उपस्थिती लावत आहे. छोटे-मोठे समारंभ, घरगुती कार्यक्रम, निधन आदी कार्यक्रमातही नगराध्यक्षांसह सर्वच संभाव्य उमेदवार उपस्थित राहत आहे. (शहर प्रतिनिधी)