सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले
By Admin | Updated: April 5, 2015 00:05 IST2015-04-05T00:05:50+5:302015-04-05T00:05:50+5:30
तालुक्याील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुका प्रशासनाने घोषित केले.

सरपंचपदाच्या आरक्षणाने अनेकांचे गणित बिघडले
गावपुढारी हादरले : महिला आरक्षण टाकणार विरजण
वणी : तालुक्याील १०१ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण तालुका प्रशासनाने घोषित केले. सरपंच बनण्यासठी गुडघ्याला बाशिंग बांधून असणाऱ्या अनेक गावपुढाऱ्यांची मात्र यामुळे गोची झाली. अनेक जण जागेवरच हिरमुसले, तर आरक्षित कोट्यातील अनेकांना संधी चालून येत असल्याने त्यांच्या आनंदाला उधाण आले.
तालुक्यातील १०१ पैकी ४० ग्रामपंचायतींची मुदत येत्या मे महिन्यात संपणार आहे. त्यामुळे या ४० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यासोबतच २३ गावांतील ५९ सदस्यांच्या रिक्त जागांसाठीही पोटनिवडणूक होत आहे. आरक्षणामुळे पोटनिवडणूक होणाऱ्या गावातही सरपंच पदामध्ये फेरबदल होण्याचे संकेत आहे. २२ एप्रिलला होणाऱ्या निवडणुकीत निवली, वागदरा, घोन्सा, पुनवट या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने अनेक पुढाऱ्यांच्या हातून संधी गेली आहे.
मारेगाव (को.), पिंपळगाव, शिरपूर या ग्रामपंचायतींचे सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित असल्याने काहींना आयतीच संधी चालून येणार आहे. मात्र यापैकी महिलांसाठीचे आरक्षण उद्या ५ एप्रिलला काढले जाणार आहे. महिलांचे आरक्षण निघाल्यानंतर अनेक पुरूषांच्या आनंदावर विरजण पडणार आहे. ढाकोरी (बोरी), वारगाव, तेजापूर, भांदेवाडा, नांदेपेरा, कुर्ली, येनक, चनाखा येथील पोट निवडणुकामुळेही सरपंच पदाचे समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
पुढील वर्ष-दोन वर्षात होणाऱ्या काही ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण निघाल्याने अनेक मातब्बर गावपुढाऱ्यांची सत्ता संपुष्टात येणार आहे. आरक्षित इच्छुक उमेदवारांना गावाच्या मतदारांमध्ये विश्वास निर्माण करण्यास वेळ मिळणार असल्याने इच्छुक उमेदवार आता कामाला लागून आपली गावात छाप पाडण्याचे प्रयत्न करणार आहेत. यामध्ये पुनवट, वेळाबाई, चिखलगाव, गणेशपूर, शिंदोला, कायर, राजूर (कॉ.), लालगुडा, तरोडा, लाठी, उकणी येथील सरपंचपदासाठी भविष्यात प्रचुड चुरस राहणार आहे. मात्र वास्तव परिस्थिती महिला आरक्षणानंतरच स्पष्ट होणार आहे. १०१ पैकी ५२ ग्रामपंचायतींमध्ये महिला राज येणार आहे. त्यामुळे अनेक गावपुढाऱ्यांवर महिलेला पद देऊन स्वत: पडद्याआडून राजकारण करण्याची वेळ येणार आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
महत्वाच्या ग्रामपंचायती झाल्या आरक्षित
तालुक्यातील चिखलगाव, शिरपूर, घोन्सा, नांदेपेरा, सावर्ला, बोर्डा, सुकनेगाव, कायर, रासा, लालगुडा आदी ग्रामपंचायती महत्त्वाच्या आहे. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीकडे तालुक्याचे लक्ष लागलेले असते. यापैकी घोन्सा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जातीसाठी, तर शिरपूर, चिखलगाव, बोर्डा येथील सरपंचपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे या गावांतील सरपंच पदावर डोळा असलेल्या अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. आता त्यांना संबंधित प्रवर्गातील उमेदवाराला खूर्ची सोपवून पडद्याआडूनच सर्व हालचाली कराव्या लागणार आहे.