संवेदनशील ठाण्यात मनुष्यबळ तोकडे

By Admin | Updated: June 20, 2014 00:08 IST2014-06-20T00:08:20+5:302014-06-20T00:08:20+5:30

वाढत्या गुन्हेगारी घटनांनी यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हे दोन्ही ठाणे संवेदनशील झाले आहेत. वाढते गुन्हे नियंत्रित करण्यासाठी या ठाण्यांना अतिरीक्त मनुष्यबळ देणे गरजेचे आहे.

Manpower hike in sensitive Thane | संवेदनशील ठाण्यात मनुष्यबळ तोकडे

संवेदनशील ठाण्यात मनुष्यबळ तोकडे

कारवाई शून्य : एलसीबीत ६० पोलीस कर्मचाऱ्यांची भरमार
यवतमाळ : वाढत्या गुन्हेगारी घटनांनी यवतमाळ शहर आणि वडगाव रोड हे दोन्ही ठाणे संवेदनशील झाले आहेत. वाढते गुन्हे नियंत्रित करण्यासाठी या ठाण्यांना अतिरीक्त मनुष्यबळ देणे गरजेचे आहे. परंतू या ठाण्यांमध्ये काम करण्यास पोलीस अधिकारीच नव्हे तर कर्मचारीही तयार नाहीत. त्यामुळेच दोन्ही पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथक मनुष्यबळाअभावी कुचकामी ठरत आहे. याउलट स्थानिक गुन्हे शाखेत २९ कर्मचाऱ्यांची मंजूरात असताना तेथे ६० च्यावर अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहे. असे असतानाही काही अपवाद वगळता या पथकांची उपयोगिता मात्र शून्य दिसत आहे.
गेल्या वर्षभरापासून यवतमाळ शहरात घरफोडी आणि जबरी चोरीचे सत्र सुरू आहे. शिवाय शरीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल होण्याचे प्रमाणही भरपूर आहे. कामाचा ताण आणि वरिष्ठांचे दडपण अशा कात्रीत येथील अधिकारी व कर्मचारी ठाण्यातील दैनंदीन कामे, बंदोबस्त, तपास करताना दिसतात. दोन्ही ठाण्यातील परिस्थिती पाहून सहसा येथे नियुक्तीसाठी अधिकारीच नव्हेतर कर्मचारीही तयार होत नाही. गुन्हे नियंत्रणाची आणि आव्हानात्मक तपासाचा छडा लावण्याची जबाबदारी असलेले गुन्हे शोध पथकाचीही फारशी उपलब्धता दिसून येत नाही. यवतमाळ शहर ठाण्याच्या गुन्हेशोध पथकात एक जमादार आणि चार कर्मचारी आहे. त्यातील दोन कर्मचारी दिवसा तर तीन कर्मचारी रात्रीला कर्तव्य बजावतात. हिच परिस्थिती वडगाव रोड ठाण्याच्या गुन्हेशोध पथकाची आहे. एक अधिकारी आणि पाच कर्मचारी पथकात असून त्यातील तिघे दिवसा तर उर्वरीत दोघे रात्रीला कर्तव्य बजावतात. त्यामुळे गोपनीय माहिती काढून गुन्हेगारांना जेरबंद करणे अथवा गुन्ह्यांचा छडा लावणे शक्य होत नाही. शिवाय दोन्ही ठाण्यात पोलीस अधिकारी आणि कर्मचारी असे ८० च्या घरात मनुष्यबळ आहे. सप्ताहीक रजा, आजारी रजा आणि अन्य कारणावरून दररोज सुमारे १५ कर्मचारी रजेवर असतात. ठाण्याची डायरी, लॉकअप गार्ड, बंदोबस्त यात सुमारे २० कर्मचारी लागतात. त्यामुळे तपास, गुन्ह्यांचा छडा, आरोपी जेरबंद करणे त्यांना शक्य होत नाही. एकीकडे संवेदनशील पोलीस ठाण्यांची ही अवस्था आहे. दुसरीकडे मात्र कधीकाळी ३० च्या घरात मनुष्यबळ कार्यरत रहात असलेल्या स्थानिक गुन्हे शाखा आणि त्यांच्या अधिनस्थ सहा पथकांमध्ये ६० च्या घरात कर्मचारी आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणात पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भरणा असल्यानंतरही या पथकांची उपयोगीता मात्र शुन्य आहे. तीन महिन्यांपासून एकाही जबरी घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात एकाही पथकाला यश आले नाही. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Manpower hike in sensitive Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.