शिक्षण व आरोग्यतून फुलतेय ‘मनोहारी’ स्वप्न

By Admin | Updated: May 17, 2014 23:54 IST2014-05-17T23:54:34+5:302014-05-17T23:54:34+5:30

गेली अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या पदाचा उपयोग स्वविकासासाठी केला जात आहे. कालपर्यंत नेत्यांचे उंबरठे झिझवणार्‍याला आता

'Manohari' dream of education and health | शिक्षण व आरोग्यतून फुलतेय ‘मनोहारी’ स्वप्न

शिक्षण व आरोग्यतून फुलतेय ‘मनोहारी’ स्वप्न

यवतमाळ : गेली अडीच वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य विभागाच्या पदाचा उपयोग स्वविकासासाठी केला जात आहे. कालपर्यंत नेत्यांचे उंबरठे झिझवणार्‍याला आता वातानुकुलीत जीवनशैलीचे डोहाळे लागले आहे. अडीच वर्षात बर्‍याच बाबतीत नेत्रदीपक प्रगती घडून आली आहे. आपले मनोहारी स्वप्न पूर्ण करण्यासाठी दोन्ही विभागाचा बोजवारा उडवला जात आहे. सत्तेसोबत सुबत्ता हे समीकरण ठरलेलेच आहे. यापूर्वीही जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्यतून अनेकांनी चांगली गंगाजळी गोळा केली आहे. येथे होणार्‍या पुरवठ्यातून मिळणारे कमीशन आणि शिक्षण विभागातील पदोन्नती, बदल्या, निलंबितांची पुनर्नियुक्ती हे सर्व मार्ग आर्थिक सुबत्ता ेदेणारेच आहे. येथे प्रत्येक गोष्ट व्यवस्था सुधरण्याऐवजी व्यवस्थित राहण्यासाठीच केली जाते, हे आजपर्यंतच्या लेख्याजोख्यावरून दिसून येते. या विभागातून सुरू असलेल्या नसत्या उठाठेवीला लगाम घालण्यासाठी शिवसेनेकडून टोकाची भूमिका घेण्यात आली. मात्र परिस्थिती आली की, कुणाचेही पाय पकडण्याची कसब अंगी असल्याने केवळ किरकोळ जखमा झेलून हे प्रकरण निस्तारले. सत्तेतून सुबत्ता मिळविण्याच्या नादात संघटनेतील ‘मधू’नेही हातभार लावायला सुरुवात केली. मुंबई वारी आणि ग्रामविकासातील संबंधाची सांगड घालत बँकॉक वारीचा योग घडवून आणला. ३४६ निमशिक्षकांना नियमित करण्याच्या प्रक्रियेसाठी प्रत्येकी दहा हजारांची खिरापतही गोळा झाल्याची चर्चा शिक्षण विभागाच्या वर्तुळात आहे. यातूनच अनेक दिवसांपासून उराशी असलेले विदेश वारीचे स्वप्न साकारण्याचा बेत ठरला. जिल्ह्यात साथीच्या आजाराचा उद्रेक झाला आहे. भर उन्हाळ्यात डेंग्यू व डायरियाने ग्रामीण भागात दहशत निर्माण केली आहे. अशा स्थितीत जबाबदारी स्वीकारण्याऐवजी आपल्या स्वप्नपूर्तीचा बेत आखण्यात आला. खूश मस्करीसाठी आपल्या लेखण्या झिजवणार्‍यांचीही संगत स्वप्नपूर्तीसाठी मिळाली. दिवसभर गावात फिरून आपले व्रत सांभाळण्यापेक्षा हितसंबंध जोपासून तुंबड्या भरणार्‍यांनीही आपली इच्छा बोलून दाखविली. अ‍ॅन्टी चेंबरच्या बंदद्वार बैठकीत पाच मे रोजीचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. शिक्षण आदर्शातून घडतं. मात्र आता शिक्षणाचा आदर्शच बिघडल्याची चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: 'Manohari' dream of education and health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.