मुलकीच्या मनीष नारनवरेला मिळाले ‘आयएएस’ कॅडर
By Admin | Updated: June 24, 2016 02:41 IST2016-06-24T02:41:51+5:302016-06-24T02:41:51+5:30
येथील मुलकी परिसरातील सारंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनीष नारनवरे यांना ‘आयएएस’ कॅडर मिळाले आहे.

मुलकीच्या मनीष नारनवरेला मिळाले ‘आयएएस’ कॅडर
यवतमाळ : येथील मुलकी परिसरातील सारंग सोसायटीमध्ये राहणाऱ्या मनीष नारनवरे यांना ‘आयएएस’ कॅडर मिळाले आहे.
मनीष नारनवरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा ५५२ गुणांसह उत्तीर्ण केली होती. युपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कॅडर बहाल करण्यात आले असून त्याची यादी बुधवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार देशात ९२ उमेदवारांना ‘आयएएस’ कॅडर मिळाले आहे. त्यात महाराष्ट्रातील १७ तर यवतमाळ जिल्ह्यातील एकमेव मनीष शंकरराव नारनवरे यांचा समावेश आहे. आता मसुरी येथील प्रशिक्षणानंतर त्यांना कोणत्या राज्यात सेवा द्यायची हे निश्चित केले जाणार आहे. मनीष हे जिल्हा विशेष लेखा परीक्षक (सहकारी संस्था) कार्यालयातील सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक शंकरराव नारनवरे यांचे सुपूत्र आहेत.
मुंबईतून एमबीबीएस केलेल्या डॉ. मनीषचे पहिली ते चौथीचे शिक्षण येथील ध्रृव प्राथमिक शाळेतून झाले आहे. विवेकानंद विद्यालयात वर्ग ५ ते १० तर अमोलकचंद महाविद्यालयातून मनीषने ११ वी व १२ वीचे शिक्षण पूर्ण केले. मनीषला दुसऱ्या प्रयत्नात युपीएससीचे हे ध्येय गाठता आले. भारतीय प्रशासकीय सेवेत जाण्याचे मनीषचे स्वप्न होते. या निमित्ताने हे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना मनीष यांचे वडील शंकरराव नारनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. मनीषची आई गृहिणी तर मोठा भाऊ एसटी महामंडळात कार्यरत आहे. देशात ५५२ रॅकिंग मिळविणारा मनीष महाराष्ट्रातून टॉप टेन आणि विदर्भातून टॉप फाईव्हमध्ये राहिला आहे. (प्रतिनिधी)
आर्णीच्या प्रदीपला ‘आयएएस’ची आशा
आधीच ‘आयएफएस’ असलेल्या आर्णी तालुक्याच्या प्रदीप देविदास मिरासे यांनीसुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. मात्र त्यांना पुन्हा ‘आयएफएस’वर समाधान मानावे लागले. दुसऱ्या यादीत ‘आयएएस’ची संधी मिळण्याची आशा प्रदीपच्या कुटुंबियांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.