जंगलातून मॅग्नीजची तस्करी
By Admin | Updated: July 27, 2014 00:20 IST2014-07-27T00:20:16+5:302014-07-27T00:20:16+5:30
परिसरातील हिवरी जंगलात सुमारे एक वर्षापूर्वी नदीच्या काठावर मॅग्नीजचे उत्खनन केल्याची घटना आता उजेडात आली आहे़ यापूर्वी ‘लोकमत’ने याच गावातील एका शेतात मॅग्नीजचे उत्खनन झाल्याचे वृत्त प्रकाशित

जंगलातून मॅग्नीजची तस्करी
नीलेश यमसनवार - पाटणबोरी
परिसरातील हिवरी जंगलात सुमारे एक वर्षापूर्वी नदीच्या काठावर मॅग्नीजचे उत्खनन केल्याची घटना आता उजेडात आली आहे़ यापूर्वी ‘लोकमत’ने याच गावातील एका शेतात मॅग्नीजचे उत्खनन झाल्याचे वृत्त प्रकाशित केले होते.
वर्षभरापूर्वी मे २०१३ च्या सुमारास जंगलालगतच्या पैनगंगा नदीचे पात्र कोरडे झाले होते. त्यावेळी हिवरी जंगलातील पैनगंगा नदीच्या काठाच्या बाजूने असलेले मॅग्नीज काढून ते आंध्रात पाठविण्यात आल्याचे आता सांगण्यात येत आहे. त्यावेळी हे मॅग्नीज उत्खनन करणाऱ्या एका मजुरानेच नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली आहे. उत्खनन केलेले मॅग्नीज काढून काही अंतरावर ते मजुरांनी पोहोचविले. त्यानंतर पुढे ते ट्रॅक्टरने आंध्रप्रदेशात रवाना करण्यात आल्याची माहिती त्या मजुराने दिली.
जंगलात रस्ते व्यवस्थित नव्हते. त्यामुळे जंगलातून ट्रॅक्टरला जाण्याकरिता रस्ताही बनविण्यात आला होता. विशेष म्हणजे त्यासाठी जंगलातील काही झाडेसुध्दा कापण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. त्यानंतर मॅग्नीजचे मोठ्या प्रमाणात उत्खनन करून ते आंध्रप्रदेशात पाठविण्यात आल्याची विश्वसनीय माहिती आहे. या तस्करीत वन विभागाने वनरक्षक व चौकीदारही गुंतल्याची जोरदार चर्चा आहे.
प्रथम उत्खनन करुन काढलेले मॅग्नीज एका शेतकऱ्याच्या शेताच्या धुऱ्यावर टाकून देण्यात येत होते. मात्र काही दिवसानंतर गावातील जागृत ग्रामस्थांनी त्या शेतकऱ्याला समज दिल्यानंतर त्याने या गोष्टीला विरोध केला होता. त्यानंतर मॅग्नीजची तस्करीही थांबविण्यात आली होती. हिवरी येथील शेतातून होणाऱ्या मॅग्नीज तस्करीचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केल्यानंतर त्या शेतकऱ्याच्या धुऱ्यावर पडलेल्या मॅग्नीजची साफसफाई करण्यात आली होती.
हिवरी येथे जंगलात सुमारे वर्षभरापूर्वी झालेल्या मॅग्नीज उत्खननावर ‘लोकमत’ने यापूर्वीच प्रकाश टाकला होता़ तरीही वन विभाग अद्याप ढिम्म का आहे, हे गुलदस्त्यात आहे़