मानेत गज शिरलेल्याचा मृत्यू
By Admin | Updated: June 15, 2016 02:46 IST2016-06-15T02:46:52+5:302016-06-15T02:46:52+5:30
निर्माणाधीन नालीत कोसळल्याने मानेत गज शिरलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला.

मानेत गज शिरलेल्याचा मृत्यू
अभियंता, ठेकेदारावर गुन्हा : प्रेतासह नातेवाईक ‘बांधकाम’वर
दिग्रस : निर्माणाधीन नालीत कोसळल्याने मानेत गज शिरलेल्या इसमाचा उपचारादरम्यान मंगळवारी मृत्यू झाला. नातेवाईकांनी प्रेतासह थेट येथील बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडक दिली. तत्पूर्वी पोलिसांनी संबंधित अभियंता आणि ठेकेदारावर गुन्हा दाखल केला.
तालुक्यातील हरसूल शेख इसा शेख मुसा (५०) हा रविवारी सायंकाळी येथील बाजार समितीसमोरील निर्माणाधीन नालीत कोसळला होता. या नालीतील बांधकामाचा गज थेट मानीतून शिरुन मेंदूपर्यंत पोहोचला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्याला नागपूर येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी शेख अयुब शेख मुसा याने दिग्रस पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या तक्रारीवरून सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे शाखा अभियंता एम.एस. माथुरकर आणि ठेकेदार प्रदीप कनिराम जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान नागपूर येथे शेख इसा याचा मृत्यू झाला. त्याचे प्रेत घेऊन नातेवाईक मंगळवारी सायंकाळी थेट दिग्रस येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. ठाणेदार संजय पुज्जलवार यांनी नातेवाईकाची समजूत घातल्यानंतर प्रेत घेऊन नातेवाईक हरसूलकडे रवाना झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
आज लावला फलक
दिग्रस येथे नालीचे बांधकाम गत तीन महिन्यांपासून संथगतीने सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी कोणताही फलक लावण्यात आला नव्हता. परंतु आज शेख इसाचे मृत्यू झाल्याचे कळताच ‘नालीचे काम चालू आहे, वाहने हळू चालवा व सुरक्षित अंतर ठेवा’ असा फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावला आहे. जीव गेल्यानंतर बांधकामला शहाणपण सूचल्याची शहरात चर्चा आहे.