मांगरुळच्या सरपंच, सचिवाला डांबले

By Admin | Updated: August 13, 2015 03:07 IST2015-08-13T03:07:27+5:302015-08-13T03:07:27+5:30

तालुक्यातील मांगरूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात चक्क सरपंच व ग्रामसेविकेला कोंडण्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली.

Mandrul Sarpanch, Secretariala Dhamble | मांगरुळच्या सरपंच, सचिवाला डांबले

मांगरुळच्या सरपंच, सचिवाला डांबले

ग्रामपंचायत कार्यालय : पोलिसांनी केली तासाभरानंतर सुटका
मारेगाव : तालुक्यातील मांगरूळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात चक्क सरपंच व ग्रामसेविकेला कोंडण्याची घटना बुधवारी सकाळी ११.३० वाजता घडली. तासाभरानंतर पोलिसांनी या दोघांची सुटका केली.
मांगरूळ येथील पुष्पा बंडू जेनेकर यांच्या घरासमोर अतिक्रमण करण्यात आले. यासंदर्भात अनेकदा तक्रारी करूनही उपयोग झाला नाही. दरम्यान बुधवारी पुष्पा जेनेकर या ग्रामपंचायत सदस्य अतुल वटे, निर्मला भोयर यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयात पोहचल्या. त्यावेळी ग्रामसेविका भाग्यश्री आलम चव्हाण यांच्यासह सरपंच मोरेश्वर गेडाम आणि दीपक दांडेकर व साहेबराव बापूजी पिदुरकर उपस्थित होते. जेनेकर यांचे निवेदन स्वीकारण्यास ग्रामसेविकेने नकार दिला. यानंतर जेनेकर, भोयर व वटे ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर आले. मात्र बाहेर जाताना त्यांनी कार्यालयाला कुलूप लावले. त्यामुळे सरपंच, सचिवांसह इतर दोघे कोंडले गेले. या घटनेची माहिती ग्रामसेविका चव्हाण यांनी मारेगाव पोलिसांना दिली. पोलिसांनी दुपारी १२.३० वाजता तेथे पोहोचून सर्वाची सुटका केली. याप्रकरणी अतुल वटे, निर्मला भोयर, पुष्पा जेनेकर यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. हे तिघे मारेगाव पंचायत समितीत निवेदन देण्यासाठी गेले. तेथे मारेगाव पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार उमेश पाटील, एएसआय तुळशीराम तोडासे, विजय चलाख, उमेश मदने आदी करीत आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Mandrul Sarpanch, Secretariala Dhamble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.