भास्कर देवकते ।लोकमत न्यूज नेटवर्कबिटरगाव : गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे.मन्याळी ते बिटरगाव हे चार किलोमीटरचे अंतर आहे. मात्र शासनाने अद्याप गावात बस सुरू केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर विद्यार्थ्यांना शाळेला चक्क बुटी मारावी लागते. गावात पहिली ते चौथीपर्यंत शाळा असून विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी बिटरगावला जावे लागते. मात्र बसअभावी त्यांना विविध अडचणींचा सामना करावा लागतो.बिटरगावला बारावीपर्यंतचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी थेट उमरखेडलाच जावे लागते. त्यासाठी पुन्हा मन्याळी ते बिटरगाव हे चार किलोमिटरचे अंतर पायदळच तुडवावे लागत आहे.राज्य शासनाने मानव विकास मिशनच्या माध्यमातून शाळेत ये-जा करण्यासाठी राज्यभर मुलींसाठी एसटी महामंडळाने बसची व्यवस्था सुरू केली. मात्र गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी येथील सावित्रीच्या लेकी पायदळच शाळेत जात आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या किमान १०० विद्यार्थिनींना शिक्षणासाठी कसरत करावी लागत आहे. सावित्रीच्या लेकींचा हा वनवास कधी संपणार, असा प्रश्न आहे.मानव विकास मिशन नावालाचमानव विकास मिशन केवळ नावालाच उरले आहे. या मिशनअंतर्गत एसटी बस नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळेत ये-जा करण्यासाठी आर्थिक भुर्दंड, मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागतो. चार किलोमीटरचा पायदळ प्रवास केल्याने त्यांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होतो. मात्र कोणताही लोकप्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नाही. मुलींसाठी किमान मानव विकास मिशनची एसटी बस सेवा तातडीने सुरू करावी, अशी पालकांची मागणी आहे.
मन्याळीला २५ वर्षांपासून बसच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2018 23:45 IST
गेल्या २५ वर्षांपासून मन्याळी व मन्याळी तांडा गावात एसटी बस सेवा बंद आहे. यामुळे नागरिकांसह विद्यार्थी व सावित्रीच्या लेकींची शिक्षणासाठी फरपट सुरू आहे.
मन्याळीला २५ वर्षांपासून बसच नाही
ठळक मुद्देशिक्षणाची फरपट : सावित्रीच्या लेकींची पायदळ वारी सुरूच