मांगलादेवीत भिंत कोसळून वृद्धा ठार
By Admin | Updated: July 9, 2016 02:34 IST2016-07-09T02:34:55+5:302016-07-09T02:34:55+5:30
जिल्ह्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे.

मांगलादेवीत भिंत कोसळून वृद्धा ठार
जिल्ह्यात सर्वदूर पाऊस : अतिवृष्टीचा इशारा
यवतमाळ : जिल्ह्यात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाल्याने शुक्रवारी सकाळपासूनच सर्वदूर पावसाची रिपरिप सुरू आहे. या पावसाने नदी-नाले तुडुंब झाले असून नेर तालुक्यातील मांगलादेवी येथे पावसाने भिंत कोसळून वृद्ध महिला ठार झाली.
मांगलादेवी येथील पार्वताबाई शंकर सहारे (६७) असे मृत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी पार्वताबाई घराशेजारी असलेल्या गोठ्यातील जनावरांना चारा टाकण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी पावसामुळे खिळखिळी झालेली गोठ्याची मातीची भिंत कोसळली. त्या खाली पार्वताबाई दबल्या. हा प्रकार माहीत होताच गावकऱ्यांनी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले. तत्काळ नेरच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे पार्वतीबाईचा पुतण्या अविनाश याचा विवाह रविवारी यवतमाळात आहे. त्यासाठी त्या सहपरिवार जाणार होत्या. परंतु त्यापूर्वीच काळाने डाव साधला. त्यांच्या मागे दोन मुले व मुलगी आहे. पावसामुळे बळी जाण्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना होय.
जिल्ह्यात शुक्रवारी सकाळपासूनच पाऊस सुरू होता. कधी रिमझीम तर कधी जोरदार पाऊस बरसत होता. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून वातावरणातही गारठा निर्माण झाला आहे. नागपूर वेध शाळेने दिलेल्या अंदाजानुसार जिल्ह्यात १० तारखेपर्यंत अतिवृष्टी होणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात समाधानकारक पाऊस बरसत आहे. आतापर्यंत मासिक सरासरीच्या ५१ टक्के पावसाची नोंद जिल्ह्यात झाली आहे. या पावसाने जलस्रोत वाढले असून तलावातील पाण्याच्या पातळीतही वाढ झाली आहे. काही नाल्यांना पूर आले आहे. मांगलादेवीची घटना वगळता जिल्ह्यात कुठेही नुकसानीची माहिती नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती निवारण कक्ष परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. (शहर वार्ताहर)
पावसाचा जोर कायम
गत २४ तासात म्हणजे ८ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी ३.८ मिमी पाऊस कोसळला. त्यात यवतमाळ ८.४०, बाभूळगाव ७, कळंब ५, नेर २, घाटंजी ५, राळेगाव १६, वणी ५, मारेगाव ५, झरी जामणी ४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी २५६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शेतकरी सुखावला
जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाने शेतकरी सुखावला आहे. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने साथ दिल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत आहे. शुक्रवारच्या पावसाने दिलासा मिळाला.