चांगल्या कामातून जीवन सार्थकी लावा
By Admin | Updated: December 3, 2014 22:57 IST2014-12-03T22:57:54+5:302014-12-03T22:57:54+5:30
सर्व मानवजात एकाच ईश्वराची संतान आहे. ईश्वर भक्तीसाठी कोणत्याही पुरोहिताची अथवा मध्यस्थाची गरज नाही. विश्वरूप निर्मिकाला ओळखून स्वत:ला ओळखा, बहुमूल्य जीवनात चांगली कामे करून

चांगल्या कामातून जीवन सार्थकी लावा
वाजीद कादरी : स्मृती पर्वात जमात-ए-इस्लामीच्या संयोजनात व्याख्यान
यवतमाळ : सर्व मानवजात एकाच ईश्वराची संतान आहे. ईश्वर भक्तीसाठी कोणत्याही पुरोहिताची अथवा मध्यस्थाची गरज नाही. विश्वरूप निर्मिकाला ओळखून स्वत:ला ओळखा, बहुमूल्य जीवनात चांगली कामे करून जीवन सार्थकी लावा, असे मत इंजिनिअर वाजीद कादरी (औरंगाबाद) यांनी व्यक्त केले.
‘जमात-ए-इस्लामी (हिंद)’ यवतमाळ द्वारा आयोजित स्मृती पर्वात ‘स्वतंत्रता, समता, बंधुता आणि इस्लाम’ या विषयावर बोलताना ते पुढे म्हणाले, मानव म्हणून आपण समान आहोत हाच विचार गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, कबीर, महात्मा फुले आदी संतांनी दिला आहे. ज्यांना जाती व्यवस्थेने नाकारले, ज्यांना मंदिराचे दरवाजे बंद होते त्यांच्यासाठी मशिदीचे दरवाजे खुले करण्याचे काम पैगंबराने केले आहे. बरोबरीची वागणूक देवून सन्मान दिला आहे, असे असतानाही कधी अज्ञानाने, कधी जातीय अहंकाराने तर कधी प्रत्यक्ष ईश्वर-अल्लाच्या नावाचा दुरुपयोग करून अशांतता निर्माण करणारे घटक पूर्वी होते आणि आजही आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अध्यक्षस्थानाहून बोलताना नांदेड येथील गुलाम समदानी म्हणाले, आपण नेहमी सकारात्मक आणि कृतज्ज्ञ असले पाहिजे. १९५० पासून दुर्बल घटकांना घटनेने आरक्षण दिले. त्याबद्दल मुस्लीमांसह सर्वांनी बाबासाहेब आंबेडकरांबरोबरच त्यावेळच्या लोकप्रतिनिधींचा आदर केला पाहिजे. केवळ विरोधासाठी विरोध करणे अत्यंत चुकीचे आहे. एकच ईश्वर माननाऱ्या इंग्रजांनी या देशात शिक्षण आणि इतरही क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे देश समृद्ध झाला, हे विसरून चालणार नाही. तसेच केवळ ब्राह्मणांना टारगेट करून चालणार नाही. सावरकरांसारखे अनेक विज्ञाननिष्ठ आणि पुरोगामी लोकांनी जे चांगले कार्य केले असेल त्यांचेही स्मरण ठेवणे अगत्याचे आहे. मुस्लीमांनी मानसिक गुलामगिरी नाकारली आहे. तो फक्त ईश्वराला भितो. इतर कोणापुढेही झुकत नाही. म्हणूनच तो प्राणाची पर्वा करीत नाही - निडर झाला आहे.
‘आधुनिक काळातील मानवी गुलामी व त्यातून मुक्तता’ या विषयावर बाळासाहेब गावंडे यांनी विचार मांडले. १५ आॅगस्ट हा बहुजनांच्यादृष्टीने स्वातंत्र्याचा नव्हे तर सत्तांतराचा दिवस ठरतो आहे. शासन प्रशासन जोडण्यासाठी दुवा असणारी माणसे बहुजनांची असतील तर खऱ्या अर्थाने प्रजातंत्र सुरू होईल, असेही ते म्हणाले.
संत कबीर विचार मंचावर यावेळी मो. तारिक मो. शमी (लोखंडवाला) यांचा विविध संस्था-संघटनांच्यावतीने सन्मान करण्यात आला. सेवानिवृत्त डीएफओ सलिमोद्दिन काझी, आसिफ गिलाणी, मो. लुकमान, शेख मुस्तफा, सैयद याकुब, अॅड. इमरान देशमुख, शेख मेहबूब आलम, मेहबूब कुरेशी, सै. जमील सै. लतीफ, आबिद खान, डॉ. मुश्ताक आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक जियाउद्दिन यांनी केले. संचालन अजमतउल्लाह खान यांनी तर आभार डॉ. अबरार अहमद खान यांनी मानले. (सांस्कृतिक प्रतिनिधी)