अवैध धंद्यांवर प्रेशर कायम ठेवा
By Admin | Updated: March 9, 2017 00:18 IST2017-03-09T00:18:00+5:302017-03-09T00:18:00+5:30
जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगावरांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून प्रेशर कायम ठेवा,

अवैध धंद्यांवर प्रेशर कायम ठेवा
एसपींचे निर्देश : प्रतिबंधात्मक कारवाई वाढविण्याच्या सूचना
यवतमाळ : जिल्ह्यातील अवैध धंदे व गुन्हेगावरांवर प्रतिबंधात्मक कारवाईच्या माध्यमातून प्रेशर कायम ठेवा, असे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी मंगळवारी क्राईम मिटींगमध्ये सर्व ठाणेदारांना दिले. कोणत्याही स्थितीत अवैध धंदे सुरू राहता कामा नये, अशी तंबी त्यांनी दिली. याशिवाय सक्रिय गुन्हेगारांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी तडीपार व एमपीडीएचे प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक दुपारी अडीच वाजता संपली.
निवडणूक बंदोबस्तानंतरची ही दुसरी क्राईम मिटींग होती. या बैठकीत पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी पोलीस प्रशासन कोणत्या दिशेने काम करणार, याचे स्पष्ट निर्देश सर्व अधिकाऱ्यांना दिले. कसे आणि कोणत्या पद्धतीने अवैध धंदे बंद करायचे, ते तुम्ही ठरवा. मला केवळ रिझल्ट दिसला पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. अवैध व्यावसायीकांवर प्रेशर कायम ठेवा, जेणेकरून कोणत्याही स्थितीतत हे धंदे सुरू राहणार नाही, असे त्यांनी ठाणेदारांना निक्षूण सांगितले.
होळी आणि शिवजयंती, या दोन प्रमुख सण, उत्सवात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी विशेष दक्षात घेण्याची सूचना त्यांनी केली. ठाण्यात पेडींग असलेले गुन्हे त्वरित निकाली काढावे, दाखल गुन्ह्याचा वेळेत तपास करून शिक्षेचे प्रमाण वाढविण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यातून गुटखा, अवैध दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी केली जाते. त्यांच्याविरूद्ध विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. जिल्ह्यातील गुन्ह्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांनी विविध सूचना केल्या.
या बैठकीला अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांच्यासह सर्व ठाणेदार उपस्थित होते. (कार्यालय प्रतिनिधी)