पांढरकवडाचा ‘वाय पॉईंट’ देवाण-घेवाणीचा मुख्य अड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 05:00 IST2020-02-11T05:00:00+5:302020-02-11T05:00:24+5:30
नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा शहरातून जातो. तेलंगणा, आंध्रप्रदेश ते मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याशी कनेक्ट होणाऱ्या या मार्गावर अनधिकृत वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. त्यामध्ये गांजा, अफीम, प्रतिबंधित गुटखा, जनावरे, टॅक्स चोरी केलेल्या महागड्या वस्तू याचा प्रामुख्याने समावेश आहे.

पांढरकवडाचा ‘वाय पॉईंट’ देवाण-घेवाणीचा मुख्य अड्डा
लोकमत न्यूज नेटवर्क
पांढरकवडा : शहरात एन्ट्री करणारा ‘वाय पॉईंट’ पोलिसांच्या देवाणघेवाणीचा मुख्य अड्डा बनला असून कुणाचीही भीती न बाळगता अवैध व्यावसायिकांकडून पैसे स्वीकारले जात आहे. हा व्यवहार पोलीस ठाण्यात नियंत्रण असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात टिपला जाऊ नये म्हणून चक्क कॅमेरेच काढून टाकण्याची ‘खास खबरदारी’ पोलिसांनी घेतल्याचे दिसते.
नागपूर-हैदराबाद हा राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ पांढरकवडा शहरातून जातो. तेलंगणा, आंध्रप्रदेश ते मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याशी कनेक्ट होणाऱ्या या मार्गावर अनधिकृत वस्तूंची मोठ्या प्रमाणात वाहतूक चालते. त्यामध्ये गांजा, अफीम, प्रतिबंधित गुटखा, जनावरे, टॅक्स चोरी केलेल्या महागड्या वस्तू याचा प्रामुख्याने समावेश आहे. विशेषत: गोवंशाचे ट्रक मोठ्या प्रमाणात तेलंगणा, हैदराबादकडे पास केले जातात. हे ट्रक पास करण्यासाठी महाराष्ट्र मार्गे दोन्ही प्रांतातून साखळी तयार केली गेली आहे. या साखळीत जिल्ह्यातील पोलीस, महामार्ग पोलीस व परिवहन खात्याची यंत्रणाही सहभागी आहे. त्यामुळेच अवैध मालाचे हे ट्रक राजरोसपणे रात्रीच नव्हे तर दिवसासुद्धा पास केले जातात. अनेकदा दिवस उजाडण्यापूर्वीच हे ट्रक पास होतात. पांढरकवड्यातील ‘वाय पॉईंट’ हा हे ट्रक पासींगचा प्रमुख मार्ग आहे. या पॉईंटवरून पांढरकवड्यातही एन्ट्री होते. या पॉईंटवर पोलीस यंत्रणा सर्रास ट्रक अडवून त्यांच्याकडून वसुली करते. कुणाचीही भीडमुर्वत न बाळगता रक्कम स्वीकारली जाते. वास्तविक वाय पॉईंटवर महामार्गावरील वाहतुकीच्या सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहे. त्याचे नियंत्रण समोरच असलेल्या थेट पांढरकवडा पोलीस ठाण्यातून केले जाते. जनतेला हे सीसीटीव्ही लागले असल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात त्यातील ‘आत्मा’ केव्हाच काढून घेऊन पोलिसांनी स्वत:चा बचाव केला आहे. कॅमेरेच नसल्याने पोलीस या पॉर्इंटवर सर्रास व बिनधास्त रक्कम स्वीकारतात. कॅमेरे काढल्याने महामार्गावरील वाहतूक पुन्हा असुरक्षित झाली आहे. पांढरकवडा ठाणेदार, एसडीपीओ आणि जिल्हा पोलीस प्रशासनासाठी ‘वाय पॉईंट’वरील ही वसुली खुले आव्हान ठरली आहे.
‘एसीबी’ मग नेमकी कुणावर करते कारवाई ?
यवतमाळ जिल्ह्यात पांढरकवडा पॉईंटच नव्हे तर प्रत्येकच शहराच्या बाहेर जाणाºया मार्गावर वाहतूक व ठाण्यातील पोलीस सर्रास उभे राहून वाहन तपासणीच्या नावाखाली वसुली करतात. खुलेआम ही रक्कम स्वीकारली जाते. अशा प्रकारावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आळा घालणे अपेक्षित आहे. मात्र ‘आमच्याकडे तक्रारच येत नाही’ हे ठेवणीतील वाक्य पुढे करून ‘एसीबी’ची यंत्रणा नेहमीच स्वत:चा बचाव करताना दिसते. ‘एसीबी’चे टार्गेट ओरियंटेड काम सुरू आहे. गेल्या वर्षीच्या कारवाईपेक्षा यावर्षी दोन-चारने आकडा वाढलेला दिसावा, तोच परफॉर्मन्स दाखविता यावा एवढाच ‘एसीबी’चा अजेंडा राहतो. वास्तविक पोलीस रस्त्यावर उभे राहून खुलेआम पैसे स्वीकारत असताना रनिंग ट्रॅप करणे एसीबीला कठीण नाही. त्यासाठी केवळ उपलब्ध यंत्रणेच्या ‘इच्छाशक्ती’ची तेवढी गरज आहे. एरव्ही एसीबीच्या यंत्रणेचा शासकीय कार्यालयांमधील नियमित ‘फेरफटका’ शासकीय यंत्रणेत नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या फेरफटक्यामागील रहस्याचीही खुद्द पोलीस दलातच चर्चा होताना दिसते.