तक्रारकर्त्याचा मामेभाऊच दरोड्याचा मुख्य सूत्रधार
By Admin | Updated: August 26, 2014 00:15 IST2014-08-26T00:15:11+5:302014-08-26T00:15:11+5:30
पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

तक्रारकर्त्याचा मामेभाऊच दरोड्याचा मुख्य सूत्रधार
तिघांना अटक : पाच लाखांच्या दरोड्याचे प्रकरण
पांढरकवडा : पिंपळखुटी चेक पोस्टची पाच लाखांच्या दरोड्याच्या घटनेने आता वेगळेच वळण घेतले असून, तक्रारकर्त्याचा मामेभाऊच या घटनेचा मुख्य सूत्रधार असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या सूत्रधाराला आणि त्याच्या दोन साथिदारांना पोलिसांनी विविध ठिकाणावरून अटक केली.
सारंग भोयर रा. पिंपळखुटी ता. कळंब असे अटकेतील मुख्य सूत्रधाराचे नाव आहे. तर रामचंद्र मडावी रा. पिंपळखुटी आणि भारत तोडासे रा. जोडमोहा अशी अटक केलेल्या त्याच्या दोन साथिदारांची नावे आहेत. यापूर्वी याच घटनेत प्रवीण राऊत रा. चाणी व दिगंबर उर्फ सनी राठोड रा. जोडमोहा यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे आता अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. १९ आॅगस्टला चेकपोस्टवरील पाच लाख रुपयांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी घेऊन येत असलेला चेकमेट कंपनीचा नोकर प्रवीण राऊत याला मारहाण करून ती रोकड पाच ते सहा जणांनी लूटून नेली. घटनेनंतर जखमी अवस्थेत प्रवीणने पांढरकवडा पोलीस ठाणे गाठले.
यावेळी त्याने सांगितलेल्या घटनाक्रमात प्रचंड तफावत होती. त्यामुळे पोलिसांनी संशयावरून त्यालाच अटक केली. त्यानंतर गोपनीय माहितीवरून सनी राठोड याला अटक केली. कोठडी दरम्यान सनीने या घटनेत भारत तोडासे याने सामिल करून घेतल्याची कबुली दिली. तेव्हापासून पोलीस भारत तोडासे याच्या मागावर होते. तो यवतमाळ येथील भाजी मंडईत काम करीत असल्याची माहिती पोलिसांना होती. त्यावरून त्यांनी मंडईत जाऊन शोध घेतला. मात्र भारत पसार झाला होता. त्याचा मोबाईल क्रमांक मिळवून लोकेशन आणि कॉल डिटेल्स काढण्यात आले. त्याच्या मोबाईलवरून सतत सारंग भोयर याच्या नावे असलेल्या मोबाईलवर कॉल केले जात असल्याचेही उघड झाले. पोलिसांनी या दोघांना त्यांच्या राहत्या घरुन शिताफीने अटक केली. अटके दरम्यान दोघांनीही पोलिसांपुढे घटनेची कबुली दिली. भारत तोडासे याच्या घरझडतीत पोलिसांनी ६० हजारांची रोकड जप्त केली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक राखी गेडाम, फौजदार संजीव खंदारे, राजकिरण मडावी, जमादार दुर्गालाल टेंभरे, विजय वानखडे आदींनी पार पाडली. (शहर प्रतिनिधी)