नवरात्रोत्सवासाठी माहूरगड सज्ज
By Admin | Updated: September 26, 2016 02:46 IST2016-09-26T02:46:08+5:302016-09-26T02:46:08+5:30
साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुकादेवीचा माहूर गड नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाला आहे.

नवरात्रोत्सवासाठी माहूरगड सज्ज
जय्यत तयारी : खासगी वाहनांना गडावर बंदी
माहूर/धनोडा : साडेतीन शक्तीपीठापैकी पूर्ण पीठ असलेल्या रेणुकादेवीचा माहूर गड नवरात्रोत्सवासाठी सज्ज झाला आहे. १ ते १० आॅक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने जय्यत तयारी केली असून यासाठी आढावा बैठक घेण्यात आली आहे.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने माहूरगडावर भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे. यासाठी प्रशासनाने नियोजन केले आहे. या कालावधीत माहूरगडावर खासगी वाहनांना पूर्णत: बंदी घालण्यात आली असून ८७ बसेसद्वारे प्रवाशांना गडावर येण्या-जाण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागातर्फे सहा ठिकाणी पथक सज्ज करण्यात येणार आहे. यात बसस्थानक, रेणुकादेवी, टी-पॉर्इंट, देवदेवश्वरी, रेणुका माता मंदिर, दत्त शिखर, अनुसयामाता देवी येथे हे स्टॉल राहणार आहे. या काळात अतिरिक्त पोलीस बळ मागविण्यात येणार असून या काळात महिला पोलीस, गृह रक्षक दलाचे जवान तैनात करण्यात येणार आहे. रेणुकादेवी संस्थानकडून महोत्सव काळात येणाऱ्या भाविकांना शुद्ध पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. मंदिर परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय उभारले जाणार आहे. दर्शनाची वेळ पहाटे ५ ते रात्री १० वाजेपर्यंत राहणार असल्याची माहिती देण्यात आली. (वार्ताहर)