बोगस बियाणे विक्रेत्यांवर नेर कृषी विभाग मेहेरबान
By Admin | Updated: August 10, 2014 23:14 IST2014-08-10T23:14:59+5:302014-08-10T23:14:59+5:30
सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार

बोगस बियाणे विक्रेत्यांवर नेर कृषी विभाग मेहेरबान
नेर : सोयाबीन बियाण्यांची उगवण क्षमता नसल्याच्या निष्कर्षाप्रत कृषी विभाग पोहोचला. मात्र संबंधित विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. हा विभाग त्यांच्यावर एवढा मेहेरबान का, असा साधार प्रश्न फसगत झालेल्या शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. दुबार पेरणीने आर्थिकदृष्ट्या मोडलेला बळीराजा मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
गारपीट आणि परतीच्या पावसामुळे बियाण्याचे सोयाबीन हाती लागले नाही. बोगस सोयाबीन बियाणे बाजारात येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु नाईलाजास्तव काही शेतकऱ्यांनी विविध कंपन्यांचे सोयाबीन बियाणे खरेदी करून पेरणी केली. परंतु चांगल्या पावसानंतरही बियाणे उगवले नाही. याविषयीच्या तक्रारी कृषी विभागाकडे मोठ्या प्रमाणात झाल्या. यावर चौकशीही करण्यात आली. त्यात बियाण्यांची उगवण क्षमताच नव्हती असा निष्कर्ष काढण्यात आला. परंतु संबंधित विक्रेत्यांवर कारवाईस टाळाटाळ होत आहे.
वटफळी, मोझर, सारंगपूर आदी ठिकाणच्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने ‘एसीएन’ कंपनीच्या बियाण्यांचा वापर केला होता. शिवाय कृषी विभागाने वितरित केलेल्या महाबीजचीही पेरणी झाली होती, अशा तक्रारींवर उपविभागीय कृषी अधिकारी, तालुक्यातील दोन कृषी अधिकारी आणि कंपनीचा एक प्रतिनिधी यांनी बियाणे उगवले नसलेल्या शेतांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना बियाणे बोगस असल्याचे निदर्शनास आले.
या बाबीची माहिती संबंधित वरिष्ठांना देण्यात आली. मात्र कारवाईबाबत निश्चित सांगितले गेले नाही. कृषी अधिकारी झंझाळ यांनीही बियाण्यांची उगवणशक्ती नसल्याचे सांगितले. मग कारवाईस विलंब का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. शेताच्या पाहणीचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला जाणार आहे. त्यांनी ठरविलेल्या धोरणानंतर कारवाई होईल, असे सांगितले जाते.
दरम्यान, अजूनही पाहणीचे पंचनामे संबंधित शेतकऱ्यांना देण्यात आले नाही. मात्र सध्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदतीविषयी कृषी विभागाजवळ कुठलेही उत्तर नाही. बियाणे कंपन्यांनी हात वर केले तर कृषी विभाग कागदी घोडे नाचवित असल्याने बळीराजा दुहेरी समस्येत अडकला आहे. (तालुका प्रतिनिधी)