रबी पिकांना बसणार महावितरणचा शॉक

By Admin | Updated: November 23, 2014 23:26 IST2014-11-23T23:26:55+5:302014-11-23T23:26:55+5:30

भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची

Mahavitaran's shock to rabi crops | रबी पिकांना बसणार महावितरणचा शॉक

रबी पिकांना बसणार महावितरणचा शॉक

पुसद : भारनियमन, खंडित वीज पुरवठा, जळणाऱ्या डीपी आणि कमी दाबाच्या वीज पुरवठा यंदाच्या रबी हंगामाला जबरदस्त शॉक देणार आहे. रबीची लगबग पुसद उपविभागात सुरू झाली असली तरी विजेची समस्या शेतकऱ्यांना संकटात आणणारी ठरू शकते.
खरीप हंगामाने दगा दिल्यानंतरही पुसद उपविभागातील शेतकरी रबीच्या तयारीला लागले आहे. गहू, हरभरा पिकांचे शेतकऱ्यांनी नियोजन केले आहे. मात्र त्यांच्या मनात वीज समस्येची कायम धास्ती आहे. पुसद, उमरखेड, महागाव, दिग्रस या तालुक्यात तब्बल आठ ते दहा तासाचे भारनियमन केले जाते. कृषी फिडरवर तर केवळ रात्रीच वीज पुरवठा होत आहे. त्याचा फटका रबी हंगामाला बसू शकत आहे. विजेची समस्या दिवसेंदिवस डोकेदुखी ठरत आहे. उपविभागात कुठेही पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होत नाही. त्यातच वीज चोरांचेही समस्या कायम आहे. उपविभागात अनेक वर्षांपासून असलेले वीज साहित्य आजही उपयोगात आहे. अनेक गावातील वीज खांब वाकलेले आहे. त्यावरून तारा लोंबकळत आहे. अर्थिंगचे तार जीर्ण झाले आहे. अनेक ठिकाणी डीपी उघड्यावर आहे. त्यामुळे पूर्ण क्षमतेने वीज पुरवठा होतच नाही. विजेची समस्या घेऊन उपविभागातील शेतकरी वीज वितरणचे उंबरठे झिजवितात. परंतु कोणताही अधिकारी या शेतकऱ्यांचे समाधान करीत नाही.
भारनियमनाव्यतिरिक्त खंडित होणारा वीज पुरवठा मोठी डोकेदुखी आहे. एकदा वीज पुरवठा खंडित झाला की दुरुस्तीसाठी कोणीही येत नाही. आठ-आठ दिवस कृषी फिडर बंद असते. यासोबतच कमी दाबाचा वीज पुरवठा मोटारपंप जाळण्यात हातभार लावत आहे. अनेक शेतकऱ्यांनी मोटारपंप लावले आहे. परंतु मोटारपंप जळण्याची भीती असल्याने शेतकरी ओलित करण्यास मागेपुढे पाहतात. या सर्वांवर मात करीत रबीचे ओलित कसे करावे, असा प्रश्न आहे.
भारनियमनासोबतच मजुरांची समस्याही कायम आहे. रात्री बे रात्री ओलित करण्यासाठी मजूर येण्यास तयार नसतात. कृषी फिडरवरची वीज रात्रीच सुरळीत राहत असल्याने रात्रीच ओलित करावे लागते. अशा स्थितीत शेतकऱ्याला हातात फावडे घेऊन ओलित करण्याशिवाय पर्याय नसतो. (वार्ताहर)

Web Title: Mahavitaran's shock to rabi crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.